COVID-19 : चीनमध्ये पुन्हा 5 लाख लोक सक्तीच्या लॉकडाऊनमध्ये, आता ‘बीफ’ अन् ‘मटण’ बाजारात आढळला ‘कोरोना’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  चीनच्या इतर शहरांमध्ये कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशा परिस्थितीत आरोग्य विभागाचे अधिकारी चिंतेत आहेत. यावर अंकुश ठेवण्यासाठी आता चिनी आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले आहे की, बीजिंगपासून सुमारे १५० किलोमीटर अंतरावर असलेल्या एक्शीन काउंटीला पूर्णपणे “सील व नियंत्रित” केले जाईल.

या वर्षाच्या सुरूवातीस वुहानमध्ये ज्याप्रकारे पावले उचलली गेली, तशीच पावले तेथेही उचलली जात आहेत. याच वुहानमधून कोरोना संसर्गाचा आजार जगभर पसरला होता. चीनमध्ये कोविड-१९ प्रकरणांची एकूण संख्या ८४,७४३ आहे, त्यापैकी ४,६४१ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर ७९,५९१ लोक बरे झाले आहेत.

चीनमधील एपिडेमिक प्रिव्हेंशन टास्क फोर्सने एका निवेदनात म्हटले आहे की, एक्शीन काउंटीमधील प्रत्येक कुटुंबातील फक्त एका व्यक्तीलाच दिवसातून एकदा औषध आणि अन्न विकत घेण्यासाठी घराबाहेर जाण्यास परवानगी असेल. बीजिंगमध्ये गेल्या २४ तासांत कोरोनाची १४ नवीन प्रकरणे नोंदली गेली आहेत. यानंतर २ कोटी लोकसंख्या असलेल्या बीजिंगमध्ये कोरोना विषाणूची एकूण ३११ प्रकरणे झाली आहेत. चीनमध्ये कोरोना महामारी नियंत्रणाखाली आली आहे, परंतु अलिकडच्या आठवड्यांत बीजिंगमध्ये आणि हुबेई प्रांताच्या आसपासच्या भागातही नवीन प्रकरणे आढळली आहेत.

चीनमधील कोरोना विषाणूचा नवीन प्रसार जूनच्या मध्यात आढळून आला. बीजिंगमध्ये अन्नपुरवठ्याचा प्रमुख स्त्रोत असलेल्या शहराच्या शिनफादी घाऊक बाजारामधून हा विषाणू पसरल्याचे सांगितले जात आहे. नवीन प्रकरणांपैकी एक तृतीयांश प्रकरणे बीफ आणि मटन विभागाशी जोडून पाहिली जात आहेत. तेथे काम करणाऱ्या लोकांना एका महिन्यापासून क्वारंटाइन केले जात आहे. अधिकृत वृत्तसंस्था शिन्हुआनुसार, एक्शीन काऊंटी ते शिनफादी बाजारात ताज्या पाण्यातील मासे सप्लाय केले जातात.

कोरोना व्हायरसचा नवीन प्रसार

बीजिंगमध्ये कोरोना विषाणूची नवीन प्रकरणे समोर आल्यानंतर संसर्गाच्या नव्या लाटेचा धोका दिसत आहे. प्रशासनाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, राजधानीमध्ये महामारीची परिस्थिती गंभीर आहे. शहराच्या प्रशासनाला ही महामारी कोठे पसरत आहे, याचा शोध सतत घ्यावा लागेल, असा इशारा त्यांनी दिला. गेल्या दोन आठवड्यांमध्ये राजधानीच्या घाऊक बाजारात आणि रेस्टॉरंट्समध्ये काम करणारे लोक तसेच मध्यम व उच्च जोखमीच्या क्षेत्रात राहणाऱ्यांची विस्तृत चाचणी घेण्यात आली आहे.

बीजिंगच्या अधिकाऱ्यांनी पुन्हा शाळा बंद केल्या आहेत आणि बर्‍याच भागात लॉकडाऊन लागू केले आहे. बीजिंगच्या बाहेर जाणाऱ्या व्यक्तीला कोरोना निगेटिव्ह अहवाल सादर करावा लागेल आणि चाचणी सात दिवसांपेक्षा जुनी नसावी. शनिवारी संपलेल्या तीन दिवसीय ड्रॅगन बोट फेस्टिव्हलमध्ये कोट्यावधी लोकांनी प्रवास केला होता. मात्र त्याच्याशी संबंधित नवीन संक्रमण आढळलेले नाही.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like