Coronavirus : चलनी ‘नोटां’सह इतर वस्तूंवर ‘कोरोना’ व्हायरस किती दिवस ‘सक्रिय’ राहतो, जाणून घ्या

बीजिंग : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसचं थैमान दिवसेंदिवस वाढत आहे. संपूर्ण जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. त्यामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. तसेच लोकांच्या मनात अनेक प्रश्नही आहेत. काही लोकांना असेही प्रश्न पडले आहेत की, ते ज्या वस्तू वापरतात त्यांत कोरोना किती दिवस जिवंत राहतो. कोरोनावरील अभ्यासात असे दिसून आले आहे की, चलनी नोटा, स्टेनलेस स्टील आणि प्लास्टिकच्या पृष्ठभागावर कोरोनाचा विषाणू बरेच दिवस जगू शकतो. घरगुती कीटकनाशके, ब्लीच आणि साबणाने सतत हात धुतल्याने या व्हायरसपासून बचाव होऊ शकतो.

स्टील आणि प्लास्टिक
हाँगकाँग विद्यापीठाच्या संशोधकांनी त्यांच्या अभ्यासाच्या निष्कर्षावर अधारित असे म्हटले आहे की, स्टेनलेस स्टील आणि प्लास्टिकच्या पृष्ठभागावर हा विषाणू चार दिवस जिवंत राहू शकतो.
हाँगकाँग विद्यापीठातील स्कूल ऑफ पब्लिक हेल्थचे लिओ पून लिटमॅन मलिक पेरिस यांनी सांगितले की, अनुकूल परिस्थितीत हा विषाणू बराच काळ कार्यरत राहतो. मात्र, प्रमाणित किटकनाशकाने हात स्वच्छ धूतल्यास या विषाणूपासून सहजपणे दूर राहता येऊ शकते.

मुद्रीत (छापील) कागद आणि टिश्यू पेपर
संशोधकांनी खोलीच्या तापमानात वेगवेगळ्या पृष्ठभागावर हा विषाणू सक्रिय असल्याचे आढळून आले आहे. त्यांना असे आढळून आले की, मुद्रीत (छापील) कागद आणि टिश्यू पेपरवर हा विषाणू तीन तास जिवंत राहू शकतो. तर लाकडू आणि कापडावर एक दिवस जिवंत राहू शकतो. काच आणि चलनी नोटांवर चार दिवस हा विषाणू जिवंत राहतो. स्टेनलेस स्टील आणि प्लास्टिकच्या पृष्ठभागावरून हा व्हायरस नष्ट होण्यास चार ते सात दिवस लागतात.

वेळोवेळी विषाणू नष्ट होतो
संशोधकांनी सांगितले की, इतर पृष्ठभागावरील विषाणू कालांतराने वेगाने नष्ट होत असल्याचे आढळून आले आहे. संशोधकांनी सांगितले की, बोट किंवा हात न लावता सुरक्षेच्या पद्धतींचा अवलंब करून प्रयोगशाळेत याच्यावर संशोधन करण्यात आले आहे. या निष्कर्षावरून संक्रमित पृष्ठभागाच्या संपर्कात एकादा व्यक्ती आला तर त्याला संसर्ग होतो का हे सांगता येऊ शकत नाही.

कोरोनाच्या सक्रियतेबाबत अहवाल प्रसिद्ध
कोरोनाच्या सक्रियतेबाबत मागील महिन्यात नेचर जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अमेरिकन संशोधकांच्या अहवालात कोरोना वेगवेगळ्या पृष्ठभागावर सक्रीय होण्याबाबत सांगण्यात आले आहे. ज्यामध्ये व्हायरस प्लास्टिक आणि स्टिलच्या पृष्ठभागावर 72 तास आणि तांब्याच्या पृष्ठभागावर हा विषाणू 24 तास सक्रीय असतो.

वारंवार हात धुणे हाच व्हायरसपासून बचाव होण्याचा मुख्य उपाय
हाँगकाँग विद्यापीठाच्या दोन्ही संशोधकांनी सांगितले की, या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याचा उत्तम मार्ग म्हणजे वारंवार आपले हात धुणे. हात स्वच्छ धुतल्यानंतरच आपल्या तोंडाला किंवा डोळ्यांना स्पर्श केला पाहिजे. कारण संसर्ग होण्याचे हे एक प्रमुख कारण आहे.