Corona Virus : चीनमध्ये ‘अबतक 2236’, जगभरात 75000 पेक्षा अधिक लोकांना संसर्ग

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चीन मध्ये कोरोना व्हायरसने अक्षरशः थैमान घातले आहे. आतापर्यंत २,२३६ लोकांचा मृत्यू झाला असून देशभरात ७५,००० लोकांना त्याची लागण झाली आहे. अत्यंत वेगाने पसरणाऱ्या कोरोनाने जगात भीतीदायक वातावरण निर्माण केले आहे. हा रोग आता चीन पुरता मर्यादित नसून ३० देशांतील लोकांना त्याची लागण झाली आहे.

कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी चीनने दोन राज्यातील लोकांना अन्य राज्यात जाण्यास बंदी घातली आहे. काही शहरांत तर लोकांना घराबाहेर पडायला देखील बंदी आहे. जपानमधील योकोहामा बंदरावर असलेल्या जहाजावरील ज्या प्रवाशांच्या चाचणीचा रिपोर्ट नॉर्मल आला आहे , अशा ५०० लोकांना जहाजावरुन बाहेर पडण्याची परवानगी देण्यात आली आहे. १४ दिवसांचा हा काळ अधिक त्रासदायक होता असे सांगत ते ५०० प्रवासी बस आणि टॅक्सी ने आपापल्या ठिकाणावर निघून गेले आहेत.

वुहान शहरातून कोरोना व्हायरस हा पूर्ण जगभर पसरलेला आहे, पण याची निर्मिती चीनच्या प्रयोगशाळेत झाल्याचीही चर्चा सुरु आहे. वुहान मधील मच्छी बाजारातीळ सरकारी प्रयोगशाळेतून हा व्हायरस पसरल्याची माहिती मिळत आहे. चीनमधील सरकारी साऊथ चायना युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजीनुसार , हुबेई प्रातांत वुहान सेंटर फॉर डिसीज कंट्रोल ने या व्हायरसची निर्मिती केली असण्याची शक्यता वर्तविली जात आहे . प्रयोगशाळेत संसर्गजन्य रोग पसरवू शकतील अशा काही प्राण्यांना ठेवण्यात आले होते. यात ६०५ वटवाघुळांचा समावेश होता.

कोरोना व्हायरसचा संसर्ग वाढू नये म्हणून चीन आता नोटांची स्वछता करीत आहे. सार्वजनिक ठिकाणी चलनात आलेल्या नोटा या नष्ट करण्यात येणार आहेत. जानेवारी महिन्यानंतर त्या नोटांवर प्रक्रिया करून परत बाजारात आणल्या जाणार आहेत.

कोरोना व्हायरसमुळे भारतातील पॅरासिटामल सह अनेक औषधांच्या किमतीत ४० ते ७० टक्क्यांनी वाढ झाली आहे. औषधांच्या पुरवठ्यावर परिणाम झाला असून, वेदनाशामक औषधांच्या किमतीत देखील वाढ झाली आहे. झायड्स कॅडीला या फार्मा कंपनीचे अध्यक्ष पंकज पटेल यांनी ही माहिती दिली आहे. त्याबरोबरच अझिथ्रोमायसिन आणि अँटिबायोटिक्स ची किंमत सुद्धा ७० टक्क्यांनी वाढली आहे. येत्या काही दिवसांत कच्या मालाची आवक झाली नाही तर अडचण येण्याची शक्यता आहे.