‘कोरोना’ व्हायरसपासून वाचायचं असेल तर घरी देखील ‘मास्क’ घाला, जाणून घ्या कशी मिळेल मदत

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –   संपूर्ण जग सध्या कोरोना विषाणूशी झुंज देत आहे. या प्राणघातक विषाणूपासून बचाव करण्यासाठी अनेक उपाय सांगितले जात आहेत. आता एका अभ्यासानुसार असे आढळले आहे की घरीसुद्धा फेस मास्क घातल्यास कुटुंबातील सदस्यांमध्ये होणारा कोरोना संक्रमणाचा प्रसार रोखता येतो.

कुटुंबातील सदस्यांमधील संक्रमण रोखण्यासाठी मदत

या अभ्यासानुसार एखाद्या व्यक्तीस संसर्ग झाला असेल तर लक्षणे दिसून येण्यापूर्वी घरात मास्क घातल्यास विषाणूचा प्रसार 79 टक्क्यांनी रोखला जाऊ शकतो. तर चीनच्या बीजिंग रिसर्च सेंटरच्या संशोधकांनी अशी माहिती दिली आहे की लक्षणे उद्भवल्यानंतर हा उपाय बचावासाठी प्रभावी ठरताना दिसत नाही. ते म्हणाले की, चीनमध्ये कोरोना संसर्गाच्या अभ्यासानुसार असे दिसून आले आहे की बहुतेक लोकांना कुटुंबातील सदस्यांमार्फतच संसर्ग झाला होता. येथेच कोरोना एका व्यक्तीपासून दुसर्‍या व्यक्तीपर्यंत पसरला.

हवेशीर घर नसल्यास देखील संसर्ग होण्याची भीती

एका नवीन अभ्यासात असे आढळले आहे की घरे आणि कार्यालयांमध्ये हवा खेळती नसल्यामुळे कोरोना विषाणूचा संसर्ग होण्याचा धोका वाढू शकतो. कोरोनासारखेच बरेच विषाणू आकारात 100 मायक्रॉन पेक्षा लहान असतात. खोकलताना आणि शिंकतानाही विषाणू द्रव कणांसह बाहेर पडतात.

बंद ठिकाणी संक्रमणाचा धोका अधिक

ब्रिटनच्या सरे युनिव्हर्सिटीच्या संशोधकांच्या म्हणण्यानुसार या द्रव कणांचे बाष्पीभवन होऊन जाते परंतु ज्या ठिकाणी हवेची हालचाल होत नाही अशा ठिकाणी ते टिकून राहतात आणि वेळोवेळी विषाणूची घनता देखील वाढत जाते. यामुळे बंद ठिकाणी संक्रमणाचा धोका वाढतो. संशोधकांनी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी इमारती हवेशीर असण्याच्या गरजेवर अधिक भर दिला.