Corona Virus : डॉक्टरच्या मृत्यूमुळं चीनमध्ये ‘जनाक्रोश’, लोकांमध्ये प्रचंड ‘संताप’ तर ‘मृत्यू’चा आकडा 636 वर

बिजिंग : वृत्तसंस्था – चीनमध्ये कोरोना व्हायरसची सर्वात आधी सूचना देणारे डॉक्टर ली वेनलियांग यांच्या मृत्यूमुळे लोकांमधील नाराजी वाढली आहे. अनेक चीनी नागरिकांनी सोशल मीडियाद्वारे सरकारविरूद्ध नाराजी व्यक्त केली आहे. यामुळे सरकारला डॉक्टरच्या मृत्यू प्रकरणी चौकशीचे आदेश द्यावे लागले आहेत. चीनमध्ये कोरोन व्हायरसमुळे आतापर्यंत 636 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर संसर्ग झालेल्या लोकांची संख्या वाढून 31,161 झाली आहे.

वुहानमध्ये व्हायरसची लागण झालेल्या 34 वर्षीय डॉक्टर वेनलियांग यांचा गुरूवारी मृत्यू झाला होता. सोशल मीडिया यूजर्सने वेनलियांग यांना नायक जाहीर करून अधिकार्‍यांवर बेजबाबदारपणाचे आरोप केले आहेत. चीनमध्ये सरकारविरोधात अशाप्रकारचा विरोध खुप कमी प्रमाणात दिसून येतो. वेनलियांग यांनी जानेवारीच्या सुरूवातीला व्हायरससंबंधी सोशल मीडियावर इशारा दिला होता.

त्यावेळी पोलिसांनी त्यांच्या इशार्‍याला अफवा मानून त्यांच्याविरोधा कारवाई करण्याची धमकी दिली होती. 3 जानेवारीला त्यांच्याकडून जबरदस्तीने एक पत्रसुद्धा लिहून घेण्यात आले होते. सोशल मीडियावरील वातावरण बिघडवल्याचे या पत्रात लिहून घेतले आहे. ही बाब समोर आल्यानंतर सरकारने चौकशीचे आदेश दिले आहेत. प्रकरणाच्या चौकशीसाठी एक उच्चस्तरीय टीम शुक्रवारी वुहानमध्ये पोहचली आहे. याच शहरातून संपूर्ण चीनसह जगातील 31 देशात जीवघेणा व्हायरस पोहचला आहे.

व्हायरसला तोंड देण्यासाठी आणले रोबोट
चीनने कोरोना व्हायरसच्या प्रकोपाला तोंड देण्यासाठी रोबोट उतरवले आहेत. या महामारीला आवरण्यासाठी वुहानमध्ये लष्कर तैनात करण्यात आले आहे. आता वुहानच्या अनेक मोठ्या हॉस्पिटलमध्ये 30 पेक्षा जास्त रोबोट तैनात करण्यात आले आहेत. हे रोबोट पीडितांवर उपचार करण्यासाठी मदत करत आहेत. चीनने गुरुवारी देशातील आर्टिफिशियल इन्टेलीजन्स (एआय) सेक्टरकडून व्हायरसशी लढण्यासाठी योगदान देण्याचे जाहीर केले होते.

जपानच्या आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी डायमंड प्रिंसेस क्रुजवर व्हायरसने पीडितांची संख्या वाढून 61 झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. हे क्रुज जपानच्या किनार्‍यावर थांबवण्यात आले आहे. मागील दोन आठवड्यापासून 3700 लोक या क्रूजवर अडकले आहेत. हाँगकाँगमध्ये सुद्धा एका क्रुजवर 3600 पेक्षा जास्त लोक थांबवून ठेवण्यात आले आहेत.

जगात मास्कचा तुटवडा
जागतिक आरोग्य संघटनेने शुक्रवारी सांगितले की, जगभरात कोरोना व्हायरसला प्रतिबंध करण्यासाठी सुरक्षात्मक सामानाची कमतरता भासत आहे. व्हायरसविरोधी मास्कची सुद्धा मोठी कमतरता जाणवत आहे. यासाठी नेपाळने कोरोन व्हायरसपासून वाचण्यासाठी चीनला एक लाख मास्क दिले आहेत.

पुण्यात चीनच्या एका नागरिकांवर उपचार
चीनच्या नागरिकाला शुक्रवारी पुण्याच्या हॉस्पिटलमध्ये सुद्धा दाखल करण्यात आले. हा नागरिक एयर इंडियाच्या विमानाने दिल्ली ते पुणे प्रवास करत होता. प्रवासात त्याला उलटीचा त्रास सुरू झाला. यानंतर कोरोना व्हायरसच्या संसर्गाच्या शक्यतेमुळे त्यास रूग्णालयात दाखल करण्यात आले. येथे त्यास वेगळे ठेवण्यात आले आहे.