Coronavirus : वुहानमध्ये नाही झाला ‘कोरोना’ व्हायरसचा ‘उगम’, चीनच्या ‘या’ मोठया शास्त्रज्ञाचा दावा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चीनच्या आरोग्य सल्लागार आणि वैज्ञानिकाने दावा केला आहे की वुहान शहरात कोरोना विषाणूची उत्पत्ती झालेली नाही. हे वैज्ञानिक कोरोना विषाणूच्या संसर्गाची तपासणी करणार्‍या राष्ट्रीय स्तरीय टीमचे लीडर देखील आहेत. चीनमध्ये त्यांना मानाचे स्थान देखील आहे. डॉक्टर झॉन्ग नानशान असे या वैज्ञानिकाचे नाव आहे. डॉ. नानशान यांनी म्हटले आहे की हे खरे आहे की चीनच्या हुबेई प्रांताची राजधानी वुहान येथून कोरोना विषाणूचा प्रसार झाला. परंतु हे खरे नाही की कोरोना विषाणूची उत्पत्ती वुहानमध्ये झाली आहे.

८३ वर्षीय डॉ. नानशान यांनी एका पत्रकार परिषदेत जगभरातील माध्यमांना सांगितले की वुहान कोरोना विषाणूचे जन्मस्थान नाही. ते म्हणाले की वुहान ही एका प्रांताची राजधानी आहे आणि त्यात १.१० कोटी लोक राहतात. होऊ शकते की हा विषाणू दुसरीकडून इथे आला असेल आणि वेगाने पसरला असेल. डॉ. झॉन्ग नानशान म्हणाले की, आम्हा वैज्ञानिक आणि डॉक्टरांची समस्या अशी आहे की आम्ही आधीपासूनच हे गृहीत धरतो की याच शहरातून मानवाकडून किंवा प्राण्यांपासून एखाद्या विषाणूची उत्पत्ती झाली असावी. परंतु, आधी आपण या प्रकरणाची चौकशी केली पाहिजे तेव्हा याबाबतीत भाष्य केले पाहिजे.

डॉ. नानशान म्हणाले की वुहान पासून कोरोना विषाणूचा प्रसार होण्यास सुरवात झाली परंतु, अद्याप या विषाणूचा उगम वुहानमध्येच झाला की नाही याची माहिती कुणालाच नाही. किंवा बाहेरून वुहानमध्ये आला असावा याची देखील माहिती नाही. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी बीजिंगमधील चिनी सरकारचे प्रवक्ते झाओ लिजियान यांनी असा आरोप केला होता की अमेरिकन सैन्याने वुहानमध्ये कोरोना विषाणूचा प्रसार केला आहे. त्यानंतरच, हा विषाणू संपूर्ण देशात वेगाने पसरत गेला.

जानेवारीपासून वेगाने पसरलेला कोरोना विषाणू २७ फेब्रुवारीपासून चीनमध्ये कमजोर होऊ लागला आहे. आता स्थानिक पातळीवर नवीन प्रकरणे समोर येत नाहीत. गेल्या २४ तासात वुहानमध्ये एकही स्थानिक प्रकरण समोर आलेले नाही. चीनमध्ये कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत ८०,९२८ लोक संक्रमित झाले आहेत. तथापि, ३२४५ लोकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासांत ३४ लोक संक्रमित असल्याचे आढळले आहे, परंतु हे लोक बाहेरून चीनमध्ये आले आहेत.