सीमा ‘वादा’वर 6 जूनला होणार ‘चर्चा’, आज चीननं उचललं ‘हे’ मोठं पाऊल, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चीन-भारत सीमेवर रक्षण करणाऱ्या आपल्या वेस्टर्न थिएटर कमांड फोर्ससाठी चीनने नवा लष्करी कमांडर नेमला आहे. शनिवारी सीमेवरील गतिरोध संपवण्यासाठी वरिष्ठ भारतीय आणि चिनी सैन्य अधिकार्‍यांमधील होणाऱ्या प्रमुख चर्चेपूर्वी हे पाऊल उचलण्यात आले आहे. पीपल्स लिबरेशन आर्मी (पीएलए) च्या वेस्टर्न थिएटर कमांडने आपल्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केले की लेफ्टनंट जनरल शु किलिंग ला त्याच्या सीमा दलांचा नवीन कमांडर म्हणून नियुक्त केले गेले आहे. वृत्तानुसार, यापूर्वी किलिंगने ईस्टर्न थिएटर कमांडमध्ये काम केले होते.

पीएलएचे वेस्टर्न थिएटर कमांड भारतासह 3,488 किलोमीटर लांबीच्या वास्तविक नियंत्रण रेषेवर (एलएसी) देखरेख ठेवते. यात सेना, हवाई दल आणि रॉकेट फोर्सच्या जवानांचा समावेश आहे. याचे प्रमुख जनरल झाओ जोंगकी हे आहेत. गेल्या महिन्याच्या सुरूवातीपासूनच चिनी आणि भारतीय सैन्य यांच्यात गतिरोध निर्माण होण्याची परिस्थिती निर्माण झाली असताना ही नवीन नियुक्ती करण्यात आली. अहवालानुसार पूर्व लडाखमधील महिन्याभराचा गतिरोध संपवण्यासाठी शनिवारी दोन्ही पक्ष विशेष ठरावांवर चर्चा करू शकतात. भारत आणि चिनी सैन्यामधील हा पहिला गहन संवाद असेल ज्याचे नेतृत्व दोन्ही सैन्य दलातील लेफ्टनंट जनरल करतील.

अधिकृत सूत्रांनी सांगितले की लेह येथील 14 कॉर्प्सचे जनरल कमांडिंग लेफ्टनंट जनरल हरिंदर सिंग भारताच्या वतीने चर्चेत भाग घेऊ शकतात. 5 मे रोजी सुमारे 250 चिनी आणि भारतीय सैनिकांमध्ये संघर्ष झाला तेव्हा लडाखमधील परिस्थिती तणावग्रस्त बनली. या घटनेत भारतीय आणि चिनी बाजूचे 100 सैनिक जखमी झाले. उत्तर सिक्कीममध्ये 9 मे रोजी अशीच एक घटना उघडकीस आली. यानंतर चीनकडून एलएसीवर मोठ्या संख्येने सैनिक तैनात करण्यात आले होते. योग्य उत्तर देण्यासाठी भारत सैन्यांची संख्याही वाढवत होता. तथापि, अलीकडे चहूबाजूंनी दबावामुळे चीनने माघार घेतली आणि एलएसीकडून सैन्य मागे घेण्यास सुरवात केली.