केवळ ‘गलवान’च नव्हे तर चीनची लालची नजर तब्बल 250 बेटांवर, ‘ड्रॅगन’चा कब्जा करण्याचा प्लॅन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारत आणि चीन यांच्यात वास्तविक नियंत्रण रेषेवर (LAC) तणाव चालू आहे. दरम्यान, दक्षिण चीन समुद्रात चिनी नौदलाच्या युद्ध सरावाचे फोटो समोर आले आहेत. एका वृत्तसंस्थेने 1 जुलैपासून सुरू असलेल्या युद्ध सरावाच्या फोटोंसोबत असे लिहिले आहे की, चीनच्या दक्षिण, उत्तर आणि पूर्व थिएटर कमांडने दक्षिण चीन समुद्र, पिवळा समुद्र आणि पूर्व चीन समुद्रात आपले नौदल कौशल्य दर्शविले आहे.

ग्लोबल टाईम्सच्या म्हणण्यानुसार, या युध्दाभ्यासामध्ये 054 ए फ्रिगेट्स आणि 052 डी मार्गदर्शित क्षेपणास्त्रांचा डिस्ट्रॉयर्सचा चांगला उपयोग झाला. भारतासोबत सध्या सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर चीनमधून येणारे हे फोटो आपली शक्ती दर्शविण्याचे उपक्रम असल्याचे म्हटले जात आहे, परंतु संरक्षण तज्ञ यास चीनच्या विस्तारवादी विचारसरणीचा नमुना मानत आहेत. चीनची नजर केवळ गलवानवरच नाही तर दक्षिण चीन सागरांच्या बेटांवरही आहे.

वास्तविक, दक्षिण चीन समुद्रात सुमारे 250 बेट आहेत. चीनला हे सर्व हस्तगत करायचे आहे. जगातील जवळजवळ एक तृतीयांश व्यापार सुमारे तीन ट्रिलियन डॉलर्स या समुद्री मार्गाने होतो. या बेटांमधून जाणाऱ्या प्रत्येक जहाजावर नजर ठेवून त्यांना थांबविण्याचा चीनचा मानस आहे. संरक्षण तज्ज्ञ एसपी सिन्हा यांनी सांगितले की, चीनला काटेकोरपणे थांबवावे लागेल. आता चीनला रोखण्यात आले नाही तर कोरोनाची परिस्थिती सामान्य झाल्यावर ते या सर्व बेटांचा ताबा घेतील.

संरक्षण तज्ञांचा असा विश्वास आहे की, भूमीवर विस्तारवादाचा प्रयत्न केल्यानंतर चीन समुद्रातही अशीच वृत्ती बाळगत आहे. चीन दक्षिण चीन समुद्रावर दावा करत आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयातही त्याला या समस्येचा सामना करावा लागला होता. दक्षिण चीन समुद्रात चीनच्या उपस्थितीला जपान आणि व्हिएतनाम विरोध करत आहेत. जपान आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान द्विपक्षीय व्यापारासाठी दक्षिण चीन समुद्रापासून मुक्त राहणे देखील महत्त्वपूर्ण आहे.

अमेरिकेने क्षेपणास्त्रांनी सज्ज असलेल्या 3 युद्धनौका इंडो पॅसिफिक समुद्रात पाठवल्या आहेत. अमेरिकन युद्धनौका जपान, व्हिएतनाम, दक्षिण कोरियामधील त्यांच्या तळांजवळ अभ्यास करतील. भारत आणि चीनमधील गालवन खोऱ्यात हिंसक चकमक झाली, ज्यामध्ये भारताचे 20 सैनिक शहीद झाले. यानंतर दोन्ही देशांच्या सीमेवर तणावाचे वातावरण आहे. पीएम मोदी यांनी लडाखला भेट दिली आणि सैनिकी अधिकाऱ्यांकडून परिस्थितीबद्दल माहिती घेतली आहे.