आपल्या सैनिकांवर अत्यंसंस्कार नाही करत चीन, लोकांनी आता दिली धमकी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  चीन सरकार गलवान खोऱ्यात मारल्या गेलेल्या सैनिकांचे अंत्य संस्कार करण्यास नकार देत आहे. इतकेच नाही तर चीनच्या सरकारने गलवान खोऱ्यात मारल्या गेलेल्या चिनी सैनिकांच्या कुटूंबांना सांगितले की, त्यांचे अंत्यसंस्कार करू नये किंवा कोणताही खासगी सोहळा आयोजित करू नये. असे करून चीन सरकारला गलवान खोऱ्यातील घटना लपवायची आहे.

चीनमधील अमेरिकन गुप्तचर स्रोतांनी ही माहिती दिली आहे. गुप्तचर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चीनच्या नागरी व्यवहार मंत्रालयाने गलवान खोऱ्यात मारल्या गेलेल्या चिनी सैनिकांच्या कुटुंबाला सांगितले कि त्यांनी अंत्यसंस्काराच्या पारंपारिक पद्धती विसरून जाव्यात.

मंत्रालयाने पुढे म्हटले आहे की, जर अंत्यसंस्कार करायचे असतील तर एका मोकळ्या जागी करा. अंत्यसंस्कार पूर्ण झाल्यानंतर कोणताही समारंभ करू नका. मात्र कोरोना विषाणूचा संसर्ग पसरण्याची भीती दाखवून सरकारने अंत्यसंस्कार करण्यास नकार दिला आहे.

बीजिंगमधील सरकारची इच्छा आहे की, गलवान खोऱ्यातील घटना आणि त्यात ठार झालेल्या चिनी सैनिकांच्या घटनेबद्दल चीनच्या कमीतकमी लोकांना माहिती व्हावे, कारण यामुळे चीनच्या कृत्याची माहिती संपूर्ण देशापर्यंत पोहोचेल.

चीनला भीती वाटते की, जर गलवान खोऱ्यात मारल्या गेलेल्या चिनी सैनिकांबद्दल चीनमध्ये किंवा आंतरराष्ट्रीय सोशल मीडियावर माहिती पसरली, तर पीपल्स लिबरेशन आर्मीची देशभर बदनामी होईल. म्हणूनच त्यांना त्यांच्या सैनिकांचे अंत्यसंस्कार देखील लपवून ठेवायचे आहेत.

मात्र गलवान खोऱ्याची बातमी चीनमधील लोकांमध्ये वेगाने पसरली आहे. जूनच्या अखेरीस एक अहवाल आला होता, ज्यात म्हटले होते कि भारतीय सैनिकांच्या शहादत आणि त्यांच्या अंत्यसंस्कारांचे व्हिडिओ सोशल मीडियावरून चीनच्या लोकांपर्यंत पोहोचत आहेत.

भारतीय सैनिकांचा आदरपूर्वक अंत्यसंस्कार पाहिल्यावर चीनच्या सैनिकांचे काय झाले याबद्दल चिनी लोक चर्चा करत आहेत. चिनी सैनिकांना इतका आदर का देण्यात आला नाही? यावर चीन सरकारचे उत्तर हे आहे की, महामारी काळात सरकारने अंत्यसंस्कारांच्या पारंपारिक पद्धती रोखल्या आहेत.

याबाबत अमेरिकेच्या वॉशिंग्टन डी.सी. मधील दूतावासाला विचारले असता तेथून त्वरित काहीच प्रतिसाद मिळाला नाही. महत्त्वाचे म्हणजे चीनने यापूर्वी देखील आपले कृत्य लपवण्यासाठी अशी पावले उचलली आहेत.

२००१ मध्ये चीनचे लढाऊ विमान आणि अमेरिकन गुप्तचर विमान दक्षिणी हेनान बेटावर धडकले होते. पण चीनने हे संपूर्ण प्रकरण अगदी चांगले लपवून ठेवले. यापूर्वी १९९९ मध्ये जेव्हा अमेरिकेने बेलग्रेडमध्ये चिनी दूतावासावर बॉम्ब टाकले होते, तेव्हाही चीन सरकारने आपल्या देशातील लोकांना याबद्दल जरासुद्धा माहित होऊ दिले नाही.

जगातील तज्ञांचा असा विश्वास आहे की, चीनची ही शांतता आणि शांततेने अंत्यसंस्कार करण्यास सांगणे दर्शवते कि लवकरच चीन अंत्यसंस्काराचे नवीन कायदे आणेल. बीजिंगमध्ये बसलेल्या सरकारला वाटत नाही की, चीनच्या लोकांना गलवान खोऱ्यातील त्यांची कृत्ये कळली पाहिजेत.