शेतकरी आंदोलनात चीन-पाकिस्तानचा संबंध नाही, आठवलेंचं स्पष्टीकरण

नागपूर : पोलीनामा ऑनलाइन – शेतकरी आंदोलनावर (Farmer Protest) अनेक भाजप (BJP) नेते टीका करत आहेत, या आंदोलनात चीन (china), पाकिस्तानचा (Pakistan) हात असल्याचा आरोपसुद्धा केला जात आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या या आंदोलनात चीन पाकिस्तान पोहचू शकत नाही, असे एनडीएचा (NDA) प्रमुख घटक पक्ष असलेल्या रिपाईचे (RPI) (आठवले) अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athavle) यांनी स्पष्ट केले आहे.

रामदास आठवले म्हणाले, शेतकऱ्यांना ज्या सुधारणा हव्या असतील त्या सुधारणा करण्यास सरकार तयार आहे, मात्र कायदाच मागे घ्या, अशी भूमिका योग्य नाही, सरकार कायदा मागे घेणार नाही. परंतु सुधारणा करण्यास तयार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी सरकारशी संवाद साधण्यास पुढे यावे, असे आवाहन देखील त्यांनी केले. शेतकरी कायदे हे शेतकऱ्यांच्या हिताचेच आहेत. थंडीमध्ये शेतकरी आहेत हे आम्हालाही चांगलं वाटत नाही, सरकारची संवादाची भूमिका आहे, शेतकऱ्यांनीही दोन पाऊल पुढे यावे, आंदोलन चिघळवणे बरोबर नाही.

आंदोलनात पाकिस्तान किंवा चीनचा काही संबंध नाही, असे आठवलेंनी स्पष्ट केले. परंतु, केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी आंदोलनात माओवादी शिरल्याचे म्हटले आहे, याबाबत विचारले असता आठवले म्हणाले, असे असेल तर त्याची चौकशी व्हावी. दरम्यान, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी देखील शेतकरी आंदोलनास चीन आणि पाकिस्तानचं पाठबळ असल्याचा आरोप केला होता. यानंतर राज्यात दानवेविरोधात निदर्शने करण्यात आली. त्यांचा निषेध नोंदवत पुतळेही जाळण्यात आले.