Coronavirus : ‘कोरोना’मुळे बिजिंगमधून शेकडो स्थानिक उड्डाणे आणि ट्रेन रद्द, सर्व शाळा देखील केल्या बंद

बिजिंग : पोलीसनामा ऑनलाइन  –  बिजिंगमध्ये कोरोना संसर्गाची 31 नवी प्रकरणे समोर आली होती. आता चीनच्या राजधानीत संक्रमित लोकांची संख्या वाढून 137 झाली आहे. रूग्ण सतत वाढू लागल्याने येथे शेकडो स्थानिक उड्डाणे आणि ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत. मागच्या सहा दिवसांच्या दरम्यान बिजिंगच्या शिनफादी घाऊक बाजारात येऊन गेलेल्या 90,000 लोकांची तपासणी करण्यात येत आहे. शहरातील एका अधिकार्‍याने इशारा दिला आहे की, स्थिती खुप गंभीर आहे.

कोरोनामुळे बिजिंग विमानतळांनी उड्डाणे केली रद्द

अधिकृत मीडियानुसार बिजिंग येथील दोन विमानतळांनी 1,255 स्थानिक उड्डाणे रद्द केली आहेत. 615 उड्डाणे बिजिंगहून अन्य शहरात जाणारी होती. तर 640 विमाने दुसर्‍या शहरातून बिजिंगमध्ये येणार होती. बिजिंगमध्ये सध्या अंतरराष्ट्रीय उड्डाणे बंद आहेत. राष्ट्रीय रेल्वे संचालकांनी प्रवाशांकडून कोणतेही अतिरिक्त शुल्क न घेता तिकीटाचे पैसे परत देण्याची घोषणा केली आहे, ज्यांनी मंगळवारपर्यंत बिजिंगला येण्यासाठी तिकीटे खरेदी केली होती.

बिजिंग आणि मकाऊवरून येणार्‍यांसाठी 14 दिवसांचे क्वारंटाईन

सध्या रस्तेमार्गाने वाहतूक सुरू आहे आणि कंपन्यांना कामे थांबवण्यास सांगितलेले नाही. संसर्गाचा धोका पाहता अनेक राज्यांनी बिजिंग आणि मकाऊहून येणार्‍या प्रवाशांना 14 दिवसांसाठी क्वारंटाईनमध्ये राहण्याची घोषणा केली आहे.

बिजिंगच्या सर्व शाळा बंद

पूर्ण बिजिंगमध्ये किड गार्डन, प्रायमरी आणि हायस्कूल बंद करण्यात आले आहेत आणि प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये ऑनलाईन अभ्यास सुरू केला आहे. कॉलेजांचे परिसरही बंद केले आहेत. बिजिंगने लायब्ररी, संग्रहालय आणि उद्यानांमध्ये त्यांच्या क्षमतेच्या 30 टक्के लोकांनाच प्रवेश देण्यास सांगण्यात आले आहे. बिजिंगने आपत्तीला तोंड देण्यासाठी कारवाई वेगाने सुरू केली आहे आणि यास स्तर तीन वरून स्तर दोन केले आहे.