सीमेवरील तणावादरम्यान मोदी सरकारचा मोठा निर्णय, चीनी बॉर्डरला जोडणारे सर्व महामार्ग होतील 10 मीटर रूंद

नवी दिल्ली : केंद्र सरकारने चीन बॉर्डरला जोडले जाणार्‍या सर्व महामार्गांची रूंदी किमान 10 मीटर करण्याचा निर्णय घेतला आहे. बॉर्डरपर्यंत पोहचणारे सर्व दोन लेनचे फिडर रोड 10 मीटर रूंद केले जातील. यामध्ये प्रामुख्याने जम्मू, काश्मीर, लेह-लडाख, अरुणाचल प्रदेश, सिक्कीमसह दुसर्‍या पर्वतीय भागातील महामार्ग योजनांचा समावेश आहे. सध्या बॉर्डरपर्यंत पोहचणारे दोन लेनचे महामार्ग 5.5 मीटर रूंद बनवले जात आहेत.

रस्ते परिवहन आणि राज्यमार्ग मंत्रालयाने मंगळवारी पर्वतीय भागात विशेषकरून चीन बॉर्डरच्या दोन लेनच्या महामार्गांच्या रूंदीचे निकष बदलले आहेत. यासोबतच सीमा रस्ते संस्था (बीआरओ), एनएचएआय, एनएचएआयडीसी, पीडब्ल्यूडीच्या चीफ इंजिनियर्स आणि राज्यांच्या मुख्य सचिवांना पत्रसुद्धा जारी केले आहे. मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले की, राष्ट्रीय महामार्गाची रूंदी वाहतुकीच्या भाराप्रमाणे ठरवली जाते. वाहनांची संख्या कमी असल्यास दोन लेनच्या राष्ट्रीय महामार्गाची रूंदी 5.5 मीटर रूंद केली जाते.

याबाबत मार्च 2018 मध्ये नव्या निकषांसंबंधी आदेश जारी करण्यात आले होते, परंतु संरक्षण मंत्रालयाने यावर आक्षेप घेतला होता. त्यांचे म्हणणे आहे की, पर्वतीय भागात कमी रूंदीच्या रस्त्यांवर अवजड लष्करी वाहने, रसद साहित्याची वाहने आणि टँक चालवण्यात अडचणी आहेत. तीव्र वळणांवर वाहने खुप कमी वेगात चालवावी लागतात. यासाठी पर्वतीय भागात विशेषकरून चीन बॉर्डरपर्यंत पोहचणारे फिडर महामार्गांची रूंदी जास्त असावी.

रस्त्याच्या दोन्हीकडे 1.5-1.5 मीटरचे साईड शोल्डर
अधिकार्‍याने सांगितले की, संरक्षण मंत्रालयाच्या सूचनेनंतर दोन लेनच्या महामार्गाची रूंदी 10 मीटर करण्यात आली आहे. यामध्ये सात मीटर रूंद रस्ता आणि रस्त्याच्या दोन्हीकडे 1.5-1.5 मीटरचे साईड शोल्डर बनवले जातील. महामार्गात साईड शोल्डर सायकल, बाईक रिक्षा इत्यादी साठी बनवले जातात.