चीनच नव्हे तर सरकारवर ज्या-ज्यावेळी काँग्रेसनं केला हल्ला, PM मोदींचे ‘सुरक्षाकवच’ बनले शरद पवार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  लडाखमध्ये भारत आणि चीनच्या सैन्यात झालेल्या हिंसक चकमकीत २० सैनिक शहिद झाल्याबद्दल कॉंग्रेस कठोर भूमिका घेत आहे. कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी हे नरेंद्र मोदी सरकारवर सतत निशाणा साधत आहेत आणि एकामागून एक प्रश्न उपस्थित करत आहेत. अशा परिस्थितीत कॉंग्रेसचे सहयोगी राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी चीन प्रकरणात मोदी सरकारची बाजू मांडण्याचे आणि राहुल गांधींना आरसा दाखवण्याचे काम केले आहे. मात्र चीनच नाही, तर जेव्हा-जेव्हा कॉंग्रेसने मोदी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे, तेव्हा प्रत्येक वेळी शरद पवार मोदींचे सुरक्षा कवच म्हणून उभे राहिलेले दिसले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत सत्य सांगावे आणि आपली जमीन परत घेण्यासाठी कारवाई करावी, तर संपूर्ण देश त्यांच्या पाठीशी उभा राहील, असे कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी म्हटले होते. यावर शरद पवार म्हणाले, ‘१९६२ मध्ये जे घडले ते आपण विसरू शकत नाही. चीनने आपली ४५ हजार चौरस किलोमीटर जमीन ताब्यात घेतली होती. ही जमीन अजूनही चीनकडे आहे, परंतु सध्या मला माहित नाही कि चीनने ती जमीन घेतली आहे की नाही. परंतु यावर बोलताना आपण इतिहास लक्षात ठेवला पाहिजे. राष्ट्रीय सुरक्षेसाठी राजकारण करता कामा नये.’

पवार म्हणाले की, हे कुणाचेही अपयश नाही. गस्त घालताना कोणी (आपल्या क्षेत्रात) आले तर, ते कधीही येऊ शकतात. हे दिल्लीत बसलेल्या संरक्षणमंत्र्यांचे अपयश आहे, असे आपण म्हणू शकत नाही. ते म्हणाले की, मला सध्या युद्धाची शक्यता दिसत नाही. चीनने धाडस तर केले आहे, परंतु भारतीय सैन्याने गलवानमध्ये जे काही बांधकाम केले आहे ते आपल्या हद्दीत केले आहे.

चीन प्रकरणावर नुकतेच पार पडलेल्या सर्वपक्षीय बैठकीत कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आणि म्हटले होते की एलएसीशी संबंधित अनेक मुद्द्यांबाबत देश अजूनही अंधारात आहे. शस्त्राशिवाय सैनिकांना कोणी पाठवले, असा सवाल राहुल यांनी उपस्थित केला होता. यावर राष्ट्रवादीचे शरद पवार म्हणाले की, सैनिकांकडे चीनच्या सीमेवर शस्त्रे होती की नव्हती, हे आंतरराष्ट्रीय कराराद्वारे ठरवले जाते. अशा संवेदनशील मुद्द्यांचा आपण आदर केला पाहिजे.

राजकारणाचे दिग्गज खेळाडू शरद पवार यांच्या वक्तव्याचा सखोल राजकीय अर्थही काढला जात आहे. २०१४ पासून बऱ्याच वेळा असे घडले आहे की, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे भाजपसह उभे राहिले आहेत. विशेषत: जेव्हा कॉंग्रेसने काही मुद्द्यावरून मोदी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला तेव्हा असे दिसले आहे.

खरतर पंतप्रधान मोदींनीही राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना सार्वजनिक व्यासपीठावरुन आपले गुरू म्हटले आहे. शरद पवार यांना मोदी सरकारमध्ये पद्मविभूषणनेही गौरविण्यात आले. कदाचित हेच कारण आहे की, जेव्हा जेव्हा मोदी अडचणीत असतात तेव्हा शरद पवार नेहमीच त्यांना मदत करण्यास तयार असतात. राफेल प्रकरणावर त्यांनी मोदी सरकारला क्लीन चिट दिली होती आणि सीएएबाबत सरकारच्या समर्थनार्थ असल्याचे दिसून आले होते.

राफेल बाबतीत जेव्हा संपूर्ण विरोधक मोदी सरकारवर निशाणा साधत होते. राहुल गांधी हे राफेल प्रकरणाबाबत मोदी सरकारवर सतत हल्ला करत होते. अशा परिस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे मोदी सरकारचे सुरक्षाकवच असल्याचे दिसून आले. शरद पवार यांनी राफेल प्रकरणावर मोदी सरकारला क्लीन चिट देत म्हटले होते की, पीएम मोदींवर लोकांना कोणतीही शंका नाही. ते म्हणाले होते की, राफेल विमान खरेदीच्या तांत्रिक बाबींविषयी चर्चा करण्याची विरोधकांची मागणी योग्य नाही.

राफेलवर बॅकफूटवर चालणार्‍या भाजपला पवारांच्या या वक्तव्याने दिलासा मिळाला होता. तत्कालीन भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी ट्वीट करून म्हटले होते की, माजी संरक्षणमंत्री शरद पवार हे पक्षीय राजकारणावरून उठून राष्ट्रीय हितात सत्य बोलत आहेत. शहा यांनी राहुल गांधींवर टीका करत म्हटले की, त्यांनी किमान आघाडीचे जुने मित्रपक्ष शरद पवार यांच्याकडून तरी शिकले पाहिजे.