भारतावर सायबर हल्ला करण्याच्या तयारीत ‘ड्रॅगन’, ‘या’ E-Mail Id पासून सावधान

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गलवान येथील घटनेनंतर भारत आणि चीन या दोन देशांमध्ये तणावाचे वातावरण आहे. गलवान येथे चिनी सैनिकांनी भारतीय सैनिकांवर हल्ला केल्यानंतर चीन भारतावर आणखी एक हल्ला करण्याच्या तयारीत असल्याचे समोर आलं आहे. दोन्ही देशांमधल्या या वादाचा फायदा घेत चीनमधल्या हॅकर्सनी भारतातील महत्त्वाच्या केंद्रावर सायबर हल्ला करण्यास सुरुवात केली आहे. हा सायबर हल्ला करण्यासाठी चिनी हॅकर्स एका ई-मेलचा वापर करत असल्याचे समोर आलं आहे.
एका वृत्तवाहिनेने प्रकाशित केलेल्या वृत्तानुसार, 21 जून म्हणजेच रविवारी चीन भारतावर सायबर हल्ला करु शकतं. यासाठी चीनच्या हॅकर्सनी 20 लाख लोकांना ई-मेलद्वारे टार्गेट करण्याचा प्लान केला आहे. यामध्ये एक ईमेल आयडीदेखील समोर आला आहे. त्यासंबंधी काही महत्त्वाच्या सुचना देखील देण्यात आलेल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, चीनी हॅकर्स एका ईमेलच्या माध्यमातून भारतावर सायबर हल्ला करणार आहेत. यामध्ये भारतीयांची खासगी आणि आर्थिक माहिती उघड होण्याची भीती आहे. चीनने भारतातील रेल्वे आणि बँकिंग सिस्टम हॅक करण्यास सुरुवात केली असल्याचंही सांगण्यात येत आहे. त्यासाठी भारतानेही सायबर सुरक्षा मोठ्या प्रमाणात वाढवली आहे. दरम्यान, ‘ncov2019 .gov. in’ या ईमेल आयडीने जर तुम्हाला कोणताही मेल किंवा फाईल्स आल्या तर त्या ओपन करू नका किंवा कोणताही रिप्लाय या मेलवर देऊ नका अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

या संदर्भात अधिक सांगायचे झाले तर मोफत कोव्हिड-19 चाचणी संदर्भात हा मेल येत असल्याची माहिती आहे. त्यामुळे अशा धोक्यापासून सुरक्षित रहा असं आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे. मागील काही महिन्यांपासून ऑस्ट्रेलियामध्ये अनेक सायबर हल्ले झाले आहेत. यामागे चीनचा हात असल्याचा संशय आहे. ऑस्ट्रेलियाने कोरोना विषाणूच्या उत्पत्तीविषयी अनेकदा चौकशी करण्यास सांगितलं असता असे हल्ले अधिक तीव्र झाल्याचे समोर आलं आहे. वारंवार होत असलेल्या या सायबर हल्ल्यांना चीनला जबाबदार धरलं जात आहे. या हल्ल्यात चीनचा हात असल्याचा पूर्ण विश्वास असल्याचे ऑस्ट्रेलियन सरकारच्या सुत्रांनी शुक्रवारी सांगितलं.