भारताविरूध्द चीननं पाकिस्तानला केलं आणखी ‘बळकट’, ड्रॅगननं PAK ला दिली ‘शक्तीशाली’ युध्दनौका

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारताविरूद्ध चीन आणि पाकिस्तानमधील संबंध दिवसेंदिवस मजबूत होत आहेत. चीनने या आठवड्यात आपल्या चार सर्वात आधुनिक युद्धनौकांपैकी एक लॉन्च केले आहे. चीन ही युद्धनौका पाकिस्तानसाठी बनवत आहे. संरक्षण उपकरणांबाबत चीन आणि पाकिस्तानमधील हे सहकार्य अशा वेळी दिसत आहे, जेव्हा दोन्ही देशांसह भारताचा तणाव कायम आहे. पाकिस्तान आणि चीनमधील लष्करी भागीदारी मजबूत होणे, भारतासाठी चिंताजनक आहे.

पाकिस्तानी नौदलाने रविवारी म्हटले की, चीन सरकारच्या शिपयार्ड हुडोंग जोंगुआने टाइप-०५४ए/पी युद्धनौकाचा सोहळा आयोजित केला. पाकिस्तानी नौदलाने आपल्या निवेदनात म्हटले की, या युद्धनौकेमुळे आपल्या प्रदेशात शांतता व स्थिरता राखण्यास मदत होईल. निवेदनात या युद्धनौकांच्या किंमतीचा उल्लेख केलेला नाही. मात्र वृत्तानुसार, प्रत्येक युद्धनौकाचे मूल्य ३५० मिलियन डॉलरपेक्षा जास्त आहे.

पाकिस्तानी लष्कराच्या विधानानुसार, ही जहाजे पाकिस्तानी नौदलाची सर्वात आधुनिक आणि मोठी जहाजे आहेत आणि भविष्यातील आव्हानांचा सामना करण्यात मदत करतील.

चिनी कंपनी २०२१ पर्यंत पाकिस्तानला चारही युद्धनौका पोचवू शकते. चीनी मीडियाच्या म्हणण्यानुसार, यामुळे पाकिस्तानी नौदलाची लढाऊ क्षमता दुप्पट होईल. पाकिस्तानी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, टाईप-0५४ए/पी फ्रिगेट हा चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मी नेव्हीचाही भाग आहे आणि त्याला पाठीचा कणा मानला जाते. चीन आणि पाकिस्तान एकत्रितपणे इतर अनेक लष्करी उपकरणेही तयार करत आहेत, ज्यात जेएफ-१७ कॉम्बॅट एअरक्राफ्टचा देखील समावेश आहे.

काही दिवसांपूर्वी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, पाकिस्तानचे भविष्य आता चीनकडेच आहे. मात्र चीनचा पाकिस्तानमधील वाढता हस्तक्षेप भारतासाठी अजिबात चांगला संकेत नाही. यामुळे पाकिस्तानच्या धोरणात्मक ठिकाणीही चीनचे नियंत्रण वाढू शकते. भारताने चीन आणि पाकिस्तान या दोन्ही देशांशी युद्ध केले आहे. १९६२ मध्ये चीनने भारतावर आक्रमण करून लडाखचा मोठा भाग ताब्यात घेतला होता. पाकिस्तानला भारताशी प्रत्येक लढाईत अपयश आले आहे.

आता असे म्हटले जात आहे की, चीन किंवा पाकिस्तान यापैकी कोणाशीही भारताचा संघर्ष वाढला, तर भारताला दोन्ही देशांना सामोरे जावे लागेल. भारताचे माजी लष्करप्रमुख आणि विद्यमान सीडीएस जनरल बिपिन रावत यांनीही असे म्हटले आहे की, भारतीय सेना युद्धासाठी सज्ज आहे. म्हणजे भारतालाही ठाऊक आहे की, आता युद्ध एका ठिकाणाहून नव्हे तर एकाच वेळी अनेक ठिकाणाहून करणे शक्य आहे.

पाकिस्तान आणि चीन यांच्यात केवळ लष्करी भागीदारीच नव्हे, तर आर्थिक भागीदारीही बळकट झाली आहे. पाकिस्तान चीनच्या बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह (बीआरआय) च्या जागतिक मोहिमेचाही एक भाग आहे. चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडोर (सीपीईसी) अंतर्गत चीनने गेल्या सहा वर्षांत पाकिस्तानमध्ये सुमारे ३० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. चीन पाकिस्तानमध्ये रस्ते, बंदरे आणि वीजनिर्मिती करत आहे. मात्र टीकाकार म्हणतात की, चीन गुंतवणूकीमुळे कर्जबाजारी असलेल्या पाकिस्तानचे ओझे आणखी वाढवेल.

अमेरिकन अधिकारी आणि अनेक पाश्चात्य विश्लेषक म्हणतात की, चीन पाकिस्तानसाठी एक कर्जाचा सापळा आहे. मात्र चीनने ही टीका फेटाळून लावत म्हटले आहे की, माहितीअभावी पाकिस्तान आणि त्यांच्यातील सहकार्याबद्दल अशा गोष्टी बोलल्या जात आहेत. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यंदा पाकिस्तानचा दौरा करणार आहेत. या दौर्‍यामध्ये बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्हशी संबंधित प्रकल्पांवरच पूर्ण लक्ष राहील, असे पाकिस्तानी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. शी जिनपिंग मे मध्येच पाकिस्तानचा दौरा करणार होते, पण कोरोना विषाणू महामारीमुळे तो रद्द झाला.

गेल्या आठवड्यात चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांनी पाकिस्तानी समकक्ष शाह महमूद कुरेशी यांचे स्वागत केले. सीपीईसी अंतर्गत नव्या मोठ्या करारास दोन्ही देशांनी सहमती दर्शवली. यामध्ये पाकिस्तानचा रेल्वे संपर्क सुधारण्यासाठी ६.८ अब्ज डॉलर्सच्या प्रकल्पांवर काम करण्याबाबत करार झाला. या भेटीनंतर दोन्ही देशांनी संयुक्त निवेदनात म्हटले होते की, चीन आणि पाकिस्तानमधील मैत्री ही काळाची कसोटी ठरली आहे आणि दोन्ही देशांमधील नेहमीची सामरिक भागीदारी पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे.