तिबेटमध्ये अंधारात चीन करतयं युद्धसराव, ड्रोन विमानांमधून बॉम्बफेक

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  लडाखमध्ये भारत आणि चीनचे सैनिक परस्परांसमोर उभे ठाकले आहेत. अमेरिकेने चीनला कुटनीतिक मार्गाने या वादावर तोडगा काढण्याचा सल्ला दिला आहे. चीनही चर्चेने तोडगा काढण्याचा प्रयत्न करतोय असे दाखवत असला तरी, पडद्यामागे मात्र चीनचे दुसरेच मनसुबे आहेत. चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या तिबेट मिलिट्री कमांडने अंधारात उंचावरील क्षेत्रात युद्ध लढण्याचा सराव केला. शत्रुच्या प्रदेशात घुसखोरीचा युद्धाभ्यास करण्यासाठी त्यांनी 4 हजार 700 मीटर उंचीवर सैन्य पाठवले होते. अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत युद्ध लढण्याच्या आपल्या क्षमतेची त्यांनी चाचणी घेतली.
युद्ध सराव नेमका किती तारखेला हा झाला त्याबद्दल कुठलीही माहिती देण्यात आलेली नाही. पण रात्री एकच्या सुमारास तिबेट मिलिट्री कमांडच्या युनिटने तांगगुला पर्वतरांगांमध्ये हा युद्ध सराव केला. या युद्धसरावामध्ये चीनने ड्रोन विमानांमधून बॉम्बफेकही केली. भारत आणि चीनची सीमा उंचावरील क्षेत्रामध्ये आहे. दोन्ही देशांमध्ये काही घटना घडल्या आहेत. त्यामुळे तिथे अतिरिक्त सैन्य तुकडया तैनात करण्यात आल्या आहेत. भारत-चीन सीमेवर स्थिती स्थिर आणि नियंत्रणात असल्याचे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने सोमवारी म्हटले होते.

भारतीय सीमेवरील चीनची कृती कम्युनिस्ट पक्षाच्या वर्तनाचाच भाग

भारताची सीमा, हाँगकाँग किंवा दक्षिण चीन समुद्रातील चीनच्या कारवाया या सत्तारूढ कम्युनिस्ट पार्टीच्या वर्तनाचाच एक भाग आहेत, असे अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माइक पॉम्पिओ यांनी म्हटले आहे. चीनचे सैनिक मोठया प्रमाणावर भारताच्या उत्तरेकडे सरकल्याचे चित्र दिसत आहे, हाँगकाँगमधील जनतेच्या स्वातंत्र्यावरही चीनने घाला घातला आहे, असेही पॉम्पिओ यांनी वादग्रस्त कायद्याच्या अनुषंगाने म्हटले आहे. इंडो-पॅसिफिक क्षेत्रात चीन वेगाने लष्करी आणि आर्थिक कारवाया करीत आहे, त्यामुळे त्या क्षेत्रातील अनेक देशांची चिंता वाढली आहे, असेही ते म्हणाले.