भारताचं नुकसान करण्यासाठी ‘ड्रॅगन’ची नवी चाल, आता चीन वाढवतोय ‘या’ आवश्यक सामानांच्या किंमती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारताचे फार्मा क्षेत्र पूर्णपणे चीनवर अवलंबून आहे. भारतीय औषध कंपन्या त्यांच्या गरजेच्या 70 टक्के एपीआय चीनकडून आयात करतात. दरम्यान, गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसाचारानंतर चीनने या उत्पादनांच्या किंमती वाढवण्यास सुरुवात केली आहे. भारताचे चीनवर अवलंबून राहणे इतके वाढले आहे की, आता तो त्याचा गैरफायदा घेत आहे. भारत दरवर्षी सुमारे 39 अब्ज डॉलर्स किमतीचे औषध तयार करतो. औषध बनविण्यासाठी आवश्यक स्टार्टींग मटेरियल एपीआयसाठी भारत मुख्यत्वे चीनवर अवलंबून आहे, आर्थिक वर्ष 2019 मध्ये भारताने चीनकडून सुमारे 17,400 कोटी (2.5 अब्ज डॉलर्स) एपीआय आयात केले.

भारत जगातील तिसरा मोठा औषध उत्पादक देश
ही गंभीर परिस्थिती उद्भवली आहे, कारण व्हॉल्यूमच्या बाबतीत भारत जगात तिसरा मोठा औषध उत्पादक देश आहे. डॉक्टर रेड्डी लॅब, ल्युपिन, ग्लेनमार्क फर्मामा, मायलन, झाइडस कॅडिला आणि फायझर सारख्या भारतातील आघाडीच्या औषध कंपन्या एपीआयसाठी मुख्यत: चीनवर अवलंबून आहेत. भारतातील 53 महत्वपूर्ण कंपन्या एपीआयचा 80-90 टक्के आयात चीनमधून करतो.

दुहेरी हल्ला करतोय चीन
वाणिज्य व उद्योग मंत्रालयांतर्गत फार्मास्युटिकल एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिलचे अध्यक्ष दिनेश दुआ यांनी सांगितले की, गलवान खोऱ्यातील घटनेनंतर चीन आपल्यावर दोन प्रकारे हल्ला करत आहे. एकीकडे तो सीमेवर हल्ला करीत आहे आणि दुसरीकडे भारताच्या अवलंबित्वाचा चुकीचा फायदा घेऊ लागला आहे. एपीआयच्या किंमतीत औषधांच्या किंमती वेगाने वाढू लागल्या आहेत.

पॅरासिटामोलच्या किंमतीत 27% वाढ
ते म्हणाले की पेरासिटामोलच्या किंमतीत 27%, सिप्रोफ्लोक्सासिनमध्ये 20% आणि पेनिसिलिन जी 20% वाढ झाली आहे. सर्व प्रकारच्या फार्मा उत्पादनांच्या किंमतीत सुमारे 20 टक्क्यांनी वाढ झाली आहे.