सीमेवरील तणावादरम्यान शी जिनपिंग यांचा लष्कराला संदेश – ‘युद्धासाठी तयारी मजबूत करा’

नवी दिल्ली : वृत्त संस्था – पूर्व लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर तणाव असताना चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी एक मोठे विधान केले आहे. लष्कर आणि सशस्त्र पोलीस दलाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांच्या एका बैठकीत त्यांनी म्हटले की, युद्धासाठी तयारी मजबूत करावी. 66 वर्षांचे शी जिनपिंग यांनी लष्कराला जास्तीत जास्त वाईट स्थितीबाबत विचार करणे आणि गुंतागुंतीच्या परिस्थितीतून ताबडतोब आणि प्रभावी पद्धतीने मार्ग काढण्यासाठी तयार राहण्यास सांगितले आहे.

शी जिनपिंग यांनी कोणत्याही धोक्याचा उल्लेख केलेला नाही, परंतु त्यांचे हे वक्तव्य प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारत आणि चीनमध्ये वाढत असलेल्या तणावाच्या दरम्यान आले आहे. भारत आणि चीनच्या दरम्यान सुमारे साडेतीन हजार किलोमीटर लांब सीमा आहे. मागील काही काळापासून पूर्व लडाख आणि उत्तर सिक्किममध्ये दोन्ही देशांच्या लष्कराचे जवान जमले आहेत. दोन्ही देशांच्या जवानांमध्ये संघर्ष देखील झाला आहे. सॅटेलाईट छायाचित्रांवरून दिसून आले आहे की, चीन लडाखजवळ एक एयरबेसचा विस्तार करत आहे. छायाचित्रात हा सुद्धा खुलासा झाला आहे की, चीनने तेथे लढाऊ विमाने सुद्धा तैनात केली आहेत.

ताज्या तणावाच्या स्थितीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजीत डोवाल, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत आणि तिन्ही सेनांचे प्रमुख, यांच्याशी चर्चा केली. यापूर्वी पंतप्रधानांनी परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला यांच्यासोबत एक वेगळी बैठक घेतली होती. काल संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सुद्धा तिन्ही सेनादलाच्या प्रमुखांशी चर्चा केली होती.