‘कोरोना’ Vaccine मध्ये चीन एक पाऊल पुढे ? ‘लसी’चा दुसरा टप्पा यशस्वी, लान्सेंटमध्येच प्रसिद्धी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या पहिल्या मानवी चाचणीचा अहवाल आला असतानाच चीनने दुसरी चाचणी यशस्वी झाल्याचा दावा केला आहे. प्रसिद्ध मेडिकल जर्नल द लान्सेंट मध्येच दोन्ही चाचण्यांचे अहवाल प्रसिद्ध करण्यात आले आहेत. चीनमध्ये कोरोना लसीच्या दुसऱ्या टप्प्यातील चाचणीचा निष्कर्ष आला असून क्लिनिकल ट्रायलमध्ये ही लस सुरक्षित असल्याचे आणि शरीरात अँटीबॉडी तयार करत असल्याचा दावा करण्यात आला आहे.

चीनच्या रोग नियंत्रण केंद्राच्या तज्ज्ञांसह संशोधनात सहभागी झालेल्या अन्य वैज्ञानिकांनी सांगितले की, या चाचणीमध्ये कोरोना लसीची सुरक्षितता आणि प्रतिकारशक्ती वाढविण्याच्या मुद्यावर परिक्षण करण्यात आले. अंदाजापेक्षा आलेले आकडे अधिक चांगले आहेत. चाचणीमध्ये सहभागी झालेला कोणताही रुग्ण लसीचा डोस दिल्यानंतर कोरोना व्हायरस किंवा सार्स-कोव्हिड-2 बाधित झालेला नाही. यामुळे सध्याच्या टप्प्यात हे सांगणे कठीण आहे की औषधाने व्हायरसच्या संक्रमणाविरोधात प्रभावी सुरक्षा दिली की नाही.

ब्रिटनच्या लंडनमधील इम्पेरियल कॉलेजचे तज्ज्ञ प्राध्यापक डॅनी अल्टमॅट यांनी सांगितले की, चीनचे संशोधन सामान्य सर्दी-ताप व्हायरसवर आधारित आहे. ज्याच्या विरोधात लोकांच्या शरिरात आधीपासूनच अँटीबॉडी असतात. या संशोधनाशी डॅनी यांचा काहीही संबंध नाही. संशोधकांनुसार 508 लोकांवर कोरोनाच्या लसीची चाचणी करण्यात आली. यामध्ये निरीक्षणातून असे समोर आले की, लस घेतलेल्या 65 टक्के रुग्ण आणि कमी लस दिलेल्या 91 टक्के रुग्णांमध्ये लसीकरणाच्या 28 दिवसांनी टी सेल किंवा अँटीबॉडी सुरक्षेसाठी प्रतिसाद देत असल्याचे दिसून आले आहे.