Coronavirus : स्पेनमध्ये ‘कोरोना’मुळं 24 तासात ‘रेकॉर्ड’ 838 जणांचा मृत्यू, जगभरात 30751 लोकांचा गेला ‘बळी’

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –  जगभरात हाहाकार माजविणाऱ्या कोरोना विषाणूने युरोपात थैमान घातले आहे. जगभरात या प्राणघातक विषाणूची 662,700 पेक्षा जास्त लोकांना लागण झाली आहे, तर 30,751 लोकांचा मृत्यू झाला आहे. केवळ स्पेनमध्येच गेल्या 24 तासात कोरोना विषाणूमुळे 838 लोकांचा मृत्यू झाला. इटलीमध्ये परिस्थिती अधिकच वाईट असून काल शनिवारी एकाच दिवशी 889 लोकांचा कोरोना विषाणूमुळे मृत्यू झाला. इटलीमध्ये मृतांचा आकडा 10,000 च्या वर गेला आहे. त्याचवेळी अमेरिकेत संक्रमणामुळे मृत्यूचा आकडा 2000 च्या वर गेला आहे. उर्वरित जगाची स्थिती जाणून घेऊया…

स्पेनमध्ये संक्रमित लोकांची मोठ्या प्रमाणात वाढ

स्पेनमध्ये रविवारी अखेरच्या 24 तासात 838 लोकांचा संसर्ग झाल्यामुळे मृत्यू झाला. यासह, स्पेनमधील कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 6,528 वर गेली आहे. स्पेनच्या आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की देशात आतापर्यंत 78,797 लोकांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची पुष्टी झाली आहे. इतकेच नव्हे तर, गेल्या 24 तासांत देशात संक्रमित लोकांच्या संख्येतही 9.1 टक्क्यांनी वाढ झाली आहे. इटलीनंतर सर्वाधिक मृत्यू झालेल्या देशात स्पेनचा दुसरा क्रमांक लागतो.

वुहान मध्ये स्थिती सामान्य होत आहे

जगातील जवळपास एक तृतीयांश लोकसंख्या कोरोना विषाणूमुळे लॉकडाउनचा सामना करत आहे. जगभरातील लाखो नोकऱ्यांवर संकट उभे आहे. दुसरीकडे, आरोग्य क्षेत्रावरील ओझे वाढले आहे. मोठ्या देशांची अर्थव्यवस्था कोरोनाने हादरली आहे. काही देशांमधील अधिकाऱ्यांचा असा विश्वास आहे की जर हे असेच चालू राहिले तर अधिक भयानक चित्र समोर येईल. तथापि, चीनमध्ये हा विषाणू जिथे पहिल्यांदा उद्भवला होता तिथे काहीशा प्रमाणात स्थिती सामान्य झाली आहे. दोन महिन्यांच्या लॉकडाउननंतर वुहान शहर आता हळूहळू सुस्थितीत येत आहे.

अमेरिकेत परिसस्थिती वाईट पण लॉकडाउन नाही

अमेरिका आता जगातील कोरोना विषाणूचे केंद्र बनत चालले आहे. तथापि, अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी शनिवारी रात्री उशिरा निर्णय घेतला की ते न्यूयॉर्क आणि न्यूयॉर्कच्या आसपासच्या राज्यांत लॉकडाउन लागू करणार नाहीत. त्याच वेळी जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, अमेरिकेत सर्वाधिक 1,24,000 लोक कोरोना संसर्गाच्या विळख्यात आहेत. अमेरिकेत आतापर्यंत 2,114 लोकांचा बळी गेला आहे. तसेच अमेरिकेतील बर्‍याच वैद्यकीय शाळा वैद्यकीय व्यावसायिकांची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी लवकरच वरिष्ठ विद्यार्थ्यांना बॅचलर डिग्री देण्याचा विचार करीत आहेत.