चीनचा मोठा निर्णय ! भारतातून येणाऱ्या परदेशी नागरिकांना प्रवेशबंदी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसच्या ( Corona Virus) संकटामुळे चीनने परदेशी नागरिकांसंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. भारतातील परदेशी नागरिकांसंदर्भात हा मोठा निर्णय घेतला असून भारतात राहणाऱ्या परदेशी नागरिकांना देशात प्रवेशबंदी केली आहे. चीनी व्हिसा ( China Visa) किंवा रेसिडन्स परमिट ( Resident Parmit) असणाऱ्या भारतातील सर्व परदेशी नागरिकांना हा निर्णय लागू असणार आहे. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, हा निर्णय तात्पुरत्या स्वरुपासाठी असून करोनाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आला आहे. याशिवाय चीनने भारतातून येणाऱ्या सर्व विमानांच्या उड्डाणावरही स्थगिती आणली आहे.

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने यासंदर्भात निवेदन दिलेअसून यामध्ये भारतात असणाऱ्या चिनी दुतावासाकडून व्हिसा किंवा रेसिडन्स परमिट असणाऱ्या नागरिकांना प्रवासाची परवानगी मिळणार नसल्याचे म्हटले आहे. आपातकालीन परिस्थिती किंवा माणुसकीच्या आधारे चीनमध्ये प्रवेश मिळू इच्छिणारे चिनी दुतावासात व्हिसासाठी अर्ज करु शकतात. त्याचबरोबर ३ नोव्हेंबरपर्यंत विझा मिळालेल्या नागरिकांना कोणतीही अडचण येणार नाही. त्याचबरोबर करोना संकटामुळे हा निर्णय घेण्यात आला असून तात्पुरत्या स्वरुपाचा असेल असं चिनी परराष्ट्र मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. त्यानंतर परिस्थिती पाहून पुढील निर्णय घेणार असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, महत्त्वाचे म्हणजे हा निर्णय फक्त भारतापुरता मर्यादित नसून याआधी इतर देशांसंबंधीही असा निर्णय घेण्यात आला आहे. करोनाचे रुग्ण वाढत असल्याने उपाययोजना म्हणून चीन पावलं उचलत आहे. भारताशिवाय ब्रिटेन, बेल्जिअम आणि फिलिपाइन्समधून नागरिकांनाही चीनमध्ये प्रवेशबंदी आहे. चबरोबर फ्रान्स, जर्मनी आणि अमेरिकेतील नागरिकांना प्रवेश करण्याआधी वैद्यकीय तपासणी अहवाल सादर करण्याचा आदेश देखील याआधी देण्यात आला आहे.