अनेक प्रकारच्या व्हायरसला नष्ट करण्यामध्ये लाभदायक आहे ‘हळद’, रिसर्चमध्ये झालं स्पष्ट

बिजिंग : हळद खुप गुणकारी असते. ताप असो की, खोकला हळदीचे दुध आईने प्यायला दिले की, असे छोटे-मोठे आजार ताबडतोब बरे झाल्याचा अनुभव अनेकांनी घेतला असेल. अनेक भारतीय तर यास रामबाण औषध मानतात. पश्चिमी देशांनी मागील दशकात हळदीवर अनेक प्रकारचे संशोधन केले आणि यास ’सुपरफुड’ बनवले. भारतीय तज्ज्ञांना तर हळदीच्या औषधी गुणांबद्दल खुप प्राचीन काळापासून ज्ञान होते.

आता संशोधकांना आढळले आहे की, सामान्यपणे वापरल्या जाणार्‍या हळदीमधील एक नैसर्गिक घटक काही व्हायरसला नष्ट करण्यास मदत करतो. हळदीतील या घटकाला ‘करक्यूमिन‘ म्हटले जाते, यामुळे ट्रान्समीसबल गॅस्ट्रोएंटेरायटिस व्हायरस (टीजीईव्ही) रोखता येतो. जो डुक्करांना संक्रमित करतो. वायरोलॉजी जर्नलमध्ये प्रकाशित अभ्यासात याबाबत माहिती देण्यात आली आहे.

टीजीईव्हीसह संक्रमणामुळे पिगलेट्समध्ये संसर्गजन्य गॅस्ट्रोएंटेरायटिस नावाचा आजार आहे, जो अतिसार, गंभीर डिहायड्रेशन आणि मृत्युसाठी कारणीभूत ठरतो. टीजीईव्ही अत्यंत संसर्गजन्य आहे आणि दोनपेक्षा कमी वयाच्या पिगलेटमध्ये खुप घातक आहे. अशाप्रकारे जागतिक डुक्कर पालन उद्योगासाठी हा एक मोठा धोका आहे. सध्या अल्फा-कोरोना व्हायरसवर कोणताही ठोस उपचार नाही आणि टीजीईव्हीसाठी एक लस आहे, ती व्हायरसच्या प्रसाराला रोखण्यासाठी प्रभावी नाही.