Corona Virus : जगभरात 67000 लोकांना ‘कोरोना’चा ‘संसर्ग’, आत्तापर्यंत चीनमध्ये 1600 जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : संपूर्ण जगभरात चीनमधील कोरोना या विषाणूने हाहाकार माजवला आहे. या विषाणूचा संसर्ग जगभरात जवळपास ६७ हजारपेक्षा जास्त लोकांना झाला आहे. त्यामध्ये भारतातील तीन रुग्णांचा समावेश आहे. चीनमध्ये या विषाणूची लागण मोठ्या प्रमाणात झाली असून शुक्रवारी अजून १४३ लोक हे कोरोनामुळे मरण पावले. त्यामुळे ही संख्या वाढून आता १६०० पर्यंत झाली आहे.

दरम्यान चीनमध्ये २६४१ नवे रुग्ण आढळले आहेत. तसेच चीनमध्ये उपचारानंतर प्रकृती पूर्णपणे सुधारून घरी जाण्यास परवानगी दिलेल्यांची संख्या ही ८०९६ इतकी आहे. कोरोनामुळे फ्रान्समध्ये एका ८० वर्षीय चीनी पर्यटकाचा मृत्यू झाला आहे. आशियाबाहेरील हा पहिला रुग्ण असा आहे जो की या विषाणुमुळे मृत्यू पावला आहे.

जगभरातील कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या
चीन – ६६,४९२ रुग्ण, हाँगकाँग – ५६ रुग्ण (एकाचा मृत्यू), जपान – २६२ रुग्ण (त्यात योकोहामा येथे नांगरलेल्या क्रूझवरील २१८ जणांचा समावेश), मकाव – १० रुग्ण, सिंगापूर – ६७ रुग्ण, थायलंड – ३४ रुग्ण, दक्षिण कोरिया – २८ रुग्ण, मलेशिया – २१ रुग्ण, तैवान – १८ रुग्ण, जर्मनी – १६ रुग्ण, व्हिएतनाम – १६ रुग्ण, अमेरिका – १५ रुग्ण (एक अमेरिकी नागरिकाचा चीनमध्ये मृत्यू), ऑस्ट्रेलिया – १४ रुग्ण, फ्रान्स – ११ रुग्ण, ब्रिटन – ९ रुग्ण, कॅनडा – ८ रुग्ण, संयुक्त अरब अमिरतीज – ८ रुग्ण, भारत – ३ रुग्ण, फिलिपिन्स – ३ रुग्ण (एकाचा मृत्यू), इटली – ३ रुग्ण, स्पेन – २ रुग्ण, रशिया – २ रुग्ण, इजिप्त, फिनलंड, कंबोडिया, स्वीडन, नेपाळ, श्रीलंका, बेल्जीयम प्रत्येकी एक, असे जगभरात कोरोना विषाणूचे रुग्ण आढळले आहेत.

क्रुझवरील तीन कोरोनाग्रस्त भारतीयांच्या प्रकृतीत सुधारणा
दरम्यान जपानच्या क्रूझवरील कोरोनाग्रस्तांपैकी तीन भारतीयांची प्रकृती उपचारादरम्यान सुधारली आहे अशी माहिती समोर आली आहे. तसेच जपानमधील भारतीय दूतावासाने सांगितले की तेथील भारतीयांमध्ये एकही नवा रुग्ण नाही. या क्रूझवर सुरक्षा अधिकारी असणाऱ्या सोनाली ठक्करला संसर्ग नसल्याचे आढळून आले आहे. दरम्यान सोनालीचे वडिल दिनेश ठक्कर यांनी सरकारकडे सोनालीसह ज्या भारतीयांना कोरोनाची लागण झालेली नाही त्यांना या क्रूझवरून हलवण्यात यावे अशी मागणी सरकारकडे केली आहे. या डायमंड प्रिन्सेस क्रूझवर ३७११ लोकांपैकी १३८ जण हे भारतीय आहेत.