…म्हणून पोलीस आयुक्तालयासमोर ‘त्या’ महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाइन – पोलिस ठाण्यात संपत्ती वरुन चाललेल्या वादाच्या तक्रारीची चिंचवड पोलिसांनी दखल न घेतल्याने पीडित महिलेने पोलीस आयुक्तालयासमोर रॉकेल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी सहाच्या सुमारास घडली.

अनिता गायकवाड (50) असे आत्महत्या करन्याचा प्रयत्न करणाऱ्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार हनुमंत बांगर यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिता यांना पाच बहिणी आहेत. त्यातील एका बहिणीने संपत्तीची वाटणी मागितली. त्यावरून त्यांच्यामध्ये वाद सुरू होते. वाटणी मागणा-या बहिणीने पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला. त्याबाबत बोलण्यासाठी पोलिसांनी अनिता यांना पोलीस चौकीत बोलावले. अनिता पोलीस चौकीत गेल्या. मात्र त्यांना पोलीस आयुक्तांना भेटण्याचे सांगितले. त्या चिंचवड येथील पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात आल्या. दरम्यान आयुक्तालयाच्या प्रवेशद्वारावर त्यांनी स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून घेतले. प्रवेशद्वारावर कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांना अडविले आणि आत्महत्या करण्यापासून रोखले. चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.