इस्त्रायलमध्ये चीनच्या राजदूताचा संशयास्पद मृत्यू, घरातच मिळाला मृतदेह

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –   इस्त्रायलमध्ये नवीन सरकारच्या शपथविधीच्या काही तासांआधीच चिनी राजदूतांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. चिनी राजदूत डू वेई (वय-58) यांचा मृतदेह हर्टजलिया येथील त्यांच्या घरी आढळला. इस्त्रायलच्या परराष्ट्र मंत्रालयानेही या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

इस्रायलमधील चीनच्या दूतावासाने याबाबत कोणतीही माहिती दिली नाही. इस्रायलमधील माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, चीनच्या राजदूतांच्या मृत्यूची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मृत्यू नेमका कोणत्या कारणांमुळे झाला, याचे कारण अद्याप समोर आले नाही. पोलीस घटनेचा तपास करत आहेत. मृतदेहावर कोणत्याही जखमा आढळल्या नसल्याचे इस्त्रायलच्या आर्मी रेडिओने म्हटले आहे. इस्त्रायलच्या परराष्ट्र मंत्रालयाने वेई यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

चीनी राजदूत वू वेई यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. वू वेई यांनी फेब्रुवारी महिन्यातच इस्रायलमधील चीनेचे राजदूत म्हणून पदभार स्विकारला होता. यापूर्वी ते युक्रेनमध्ये चीनचे राजदूत होते. 58 वर्षीय वेई यांचा मृतदेह बेडवर आढळून आला. झोपेतच त्यांचा मृत्यू झाला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या कुटुंबामध्ये पत्नी आणि एक मुलगा आहे. बऱ्याच दिवसांपासून सत्तासंघर्षानंतर बेंजामिन नेत्याहू हे रविवारी पाचव्यांदा अध्यक्षपदाची शपथ घेणार आहेत.