अनिल अंबानींची विदेशातील संपत्ती जप्त करण्याचा प्रयत्न करतील चीनी बँका, जाणून घ्या प्रकरण

नवी दिल्ली –  वृत्तसंस्था :  अनिल अंबानी यांची परदेशी मालमत्ता जप्त करुन आता तीन चिनी बँकांनी त्यांची थकबाकी वसूल करण्याचा निर्णय घेतला आहे. या बँकांनी अनिल अंबानीच्या कंपन्यांना सुमारे 5,276 कोटी रुपयांचे कर्ज दिले आहे.

इंडस्ट्रीयल अँड कमर्शियल बँक ऑफ चायना, चीनच्या एक्स्पोर्ट-इम्पोर्ट बँक आणि चायना डेव्हलपमेंट बँकेने निर्णय घेतला आहे की ते आपल्या हक्कांचा उपयोग करत अनिल अंबानी त्यांच्यावर अंमलबजावणीची कारवाई करतील आणि जगभरातील त्यांची मालमत्ता मिळविण्याचा प्रयत्न करतील.

विशेष म्हणजे शुक्रवारी याप्रकरणी ब्रिटनमधील सुनावणीदरम्यान अनिल अंबानी यांनी असे म्हटले होते की, आपल्याकडे काहीच उरलेले नाही आणि ते आपल्या पत्नीचे दागिने विकून जगत आहेत.

काय म्हणाले बँकांचे वकील

चीनी बँकांचे वकील थांकी क्यूसी यांनी शुक्रवारी यूकेच्या कोर्टाला सांगितले की, अनिल अंबानी बँकांना एक रुपयाही न देण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. शुक्रवारी त्यांची बाजू जाणून घेतल्यानंतर आता बँकांनी निर्णय घेतला आहे की अनिल अंबानी यांच्यावर अंमलबजावणीची कारवाई केली जावी आणि सर्व शक्य पर्याय अवलंबले जातील. ते म्हणाले की ते आपल्या हक्कांचा पूर्ण वापर करतील.

एकूण थकबाकी किती आहे

महत्त्वाचे म्हणजे 22 मे रोजी ब्रिटिश कोर्टाने आपल्या आदेशात अनिल अंबानी यांना चीनी बँकांना 5,276 कोटी रुपये आणि तिन्ही चीनी बँकांना 7.04 कोटी रुपये देण्यास सांगितले होते. व्याज वगैरे जोडून हे कर्ज जूनपर्यंत वाढून 5281 कोटी रुपये झाले.

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, चीनी बँका या प्रकरणात अनिल अंबानी यांच्या प्रतिज्ञापत्राची वाट पहात आहेत. खरं तर, 29 जून रोजी एका आदेशात ब्रिटिश कोर्टाने अनिल अंबानी यांना त्यांच्या विदेशातील मालमत्ता, उत्पन्न, देय, बँक स्टेट, शेअर प्रमाणपत्र, ताळेबंद इत्यादींविषयी प्रतिज्ञापत्रात संपूर्ण माहिती देण्यास सांगितले होते. परंतु शुक्रवारी सुनावणी होण्यापूर्वी अनिल अंबानी यांना कोर्टाचा आदेश मिळाला की त्यांची आर्थिक कागदपत्रे कोणत्याही तृतीय पक्षाला दिली जाऊ नयेत.