केजरीवाल सरकारनं राजधानी दिल्लीत 1.4 लाख चिनी CCTV कॅमेरे लावल्यानं नवा वाद

पोलीसनामा ऑनलाईन टीम – दिल्लीत अरविंद केजरीवाल सरकारने तब्बल 1 लाख 40 हजार चिनी सीसीटीव्ही कॅमेर बसवले असल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. भारतात सध्या चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकला जावा यासाठी मोहीम सुरु आहे. केंद्र सरकारने 59 चिनी अ‍ॅपवर बंदी आणल्यानंतर हा विरोध अजून तीव्र झाला आहे.

दिल्लीत लावण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे चिनी कंपनी हिकव्हिजनने तयार केलेले आहेत. तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीतील हजारो लोकांनी या कंपनीचं अ‍ॅप आपल्या मोबाइलमध्ये डाउनलोड केलेले असून यामुळे सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण होण्याची भीती आहे. भाजपाने या मुद्द्यावरुन आम आदमी पक्षाला टार्गेट केले असून लवकरात लवकर ही चूक सुधारावी अशी मागणी केली आहे. यावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी हे सगळे राजकारण असल्याचे म्हटले आहे. सीसीटीव्ही हा एकमेव धोका नाही. पण जेव्हा लोक सीसीटीव्ही पाहण्यासाठी चिनी कंपनीचं अ‍ॅपडाउनलोड करतील तेव्हा मोठा धोका आहे.

अशी माहिती सायबर सेक्युरिटी एक्स्पर्ट अनुज अग्रवाल यांनी दिली आहे. हे अ‍ॅप चीनमधील कोणतीही कंपनी, सरकार किंवा लष्कराकडून हाताळलं जाऊ शकते. अशा स्थितीत दिल्लीच्या रस्त्यांवर काय सुरु आहे याची माहिती त्यांना मिळत राहील. अशी घुसखोरी रोखण्यासाठी कोणतीही सुरक्षा फिचर्स यामध्ये नाहीत, असेही त्यांनी सांगितले.