BIS चा चीनी कंपन्यांना मोठा झटका ! मोबाईल, टीव्हीच्या सुट्या भागांच्या आयातीस विलंब

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गलवान खोऱ्यात भारत आणि चीनी सैनिकांमध्ये झालेल्या चकमकीनंतर देशभरात चीनविरोधातील रोष वाढताना दिसत आहे. चीनी मालाच्या बंदीची मागणी झाल्यानंतर भारतानं अनेक कठोर पावलं टाकली आहे आणि चीनला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. भारतात ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्डनं (BIS) गेल्या काही आठवड्यात चीनी कंपन्यांच्या मोबाईलच्या सुट्या भागाच्या आणि टीव्हीच्या आयातीला मंजुरी देण्यास विलंब केला आहे. रॉयटर्स या वृत्तसंस्थेनं यासंदर्भात वृत्त दिलं आहे. दरम्यान मोबाईलच्या सुट्या भागाच्या आणि टीव्हीच्या आयातीला मंजुरी देण्यास विलंब होत असल्यानं याचा फटका शाओमी आणि ओप्पोसारख्या कंपन्यांना बसला आहे. इतकंच नाही तर त्यांना नुकसान सोसावं लागत आहे.

बीआयएसचे संचालक प्रमोद कुमार तिवारी यांनी या प्रकरणी कोणतीही प्रतिक्रिया देलेली नाही. इतकंच नाही तर चीनच्या परराष्ट्र आणि वाणिज्य मंत्रालयाकडूनही कोणती प्रतिक्रिया आलेली नाही. नुकसान सोसत असलेल्या शाओमीनं देखील यावर काही प्रतिक्रिया दिलेली नाही. ओप्पो आणि भाराताच्या वाणिज्य मंत्रालयानं देखील या प्रकरणी काहीही भाष्य केलेलं नाही. एका अधिकाऱ्यानं रॉयटर्स या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं की, “काही काळापासून भारत आणि चीन यांच्यातील संबंध ताणले गेले आहेत. असं असताना चीनच्या कोणत्याही गुंतवणुकीला मंजुरी मिळणं कठिण आहे. आता आम्ही पूर्वीप्रमाणं व्यापार करू शकत नाही.”

एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं याबाबत बोलताना सांगितलं की, “सध्या सरकार एक नवीन धोरण तयार करत आहे. ऑगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत त्याची घोषणा करण्यात येईल. धोरणानुसार, चीन आणि इतर देशातून येणाऱ्या खराब गुणवत्तेच्या वस्तूंवर बंदी घालण्यात येणार आहे. या बदलांमुळंच सध्या चीनी कंपन्यांच्या आयतीसाठी मिळणाऱ्या मंजुरीला विलंब होत आहे.”पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वीच आत्मनिर्भर भारतचं आवाहन केलं होतं. अशात आता भारतीय उद्योग मात्र देशांतर्गत तयार होणाऱ्या उत्पादनांच्या विक्रीवर भर देताना दिसत आहेत.

मोबाईल बद्दल बोलायचं झालं तर सध्याच्या स्थितीत भारतात विक्री होत असलेले 10 पैकी 8 मोबाईल हे शाओमी आणि ओप्पो या कंपन्यांचे आहेत. या दोन्ही कंपन्या त्यांच्या मोबाईलच्या मॉडेलचं अॅसेंबलिंग भारतात करतात. परंतु यासाठी जे सुटे भाग वापरले जातात ते मात्र चीनवरून आयात केले जातात. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारपर्यंत जगभरातील 643 कंपन्यांचे आयात अर्ज हे प्रलंबित आहेत. यापैकी 394 अर्ज हे गेल्या 20 दिवसांपासून प्रलंबित आहेत. परंतु यात नेमका किती चीनी कंपन्यांचा समावेश आहे याबाबत मात्र बीआयएसच्या वेबसाईटवर कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.