चीननं भारताला डिवचलं, म्हणाला – ‘तुम्हाला चीनी वस्तूंशिवाय पर्यायच नाही, बहिष्कार दूरच’

पोलीसनामा ऑनलाईन टीम : लडाखमध्ये एलएसीवर तणाव कमी करण्यासंदर्भात चीनकडून प्रयत्न सुरू असले तरी, त्यांच्या सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाईम्सने पुन्हा एकदा भारतावर निशाणा साधला आहे. काही भारतीयांमुळे देशात चीन विरोधी भावना निर्माण होत आहे. सामान्य भारतीयांना चीनविरोधात भडकवण्याची आणि चीनला कलंकित करण्याचा प्रयत्न जाणूनबूजून केला जात आहे. चीनची उत्पादने सामान्य भारतीयांच्या जीवनातील अविभाज्य भाग बनले असून ते हटवणे कठिण आहे.

चीनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याचे आवाहन पूर्णपणे अपयशी ठरेल. सध्या भारतात चीनच्या वस्तूंवर बहिष्कार टाकून स्वदेशी वस्तू वापरण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. छापण्यात आलेल्या लेखात सोनम वांगचूक यांचा देखील उल्लेख करण्यात आला आहे. त्यांनी युट्यूबर एक व्हिडीओ टाकत चीनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याची विनंती केली होती.

सोनम वांगचूक यांच्यासारख्या व्यक्ती सामान्य भारतीयांना चीनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्यासाठी प्रवृत्त करत आहेत. सीमेवर भारत आणि चीनदरम्या असलेला तणाव हा गंभीर नाही आणि दोन्ही देश यावर चर्चा करत आहेत. परंतु काही भारतीय माध्यमे आणि काही भारतीय चीनला कलंकित करण्याचा प्रयत्न करत आहेत, असं शँघाय इंस्टीट्यूट फॉर इंटरनॅशनल स्टडीजचे झाओ जेनचेंग यांनी या लेखात म्हटले आहे.