भारताला शस्त्रास्त्र विकू नका, चीनची रशियाला विनंती ?

पोलिसनामा ऑनलाईन – पूर्व लडाखसह चीनला लागून असलेल्या 3 हजार 488 किलोमीटरच्या सीमारेषेवर सध्या मोठया प्रमाणावर तणाव आहे. चीनने पुन्हा आगळीक केल्यास त्याला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारतही सज्ज आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा सध्याचा रशिया दौरा त्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे. सिंह यांच्या रशिया दौर्‍यात फायटर विमानांसाठी लागणार्‍या सुट्टया भागांचा तात्काळ पुरवठा करण्याची मागणी करण्यात येणार आहे. मात्र, पीपल्स डेलीने रशियाने भारताला शस्त्रास्त्रे देऊ नये असे मत व्यक्त केले आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, या संवेदनशील काळात रशियाने भारताला शस्त्रास्त्रे देऊ नये. आशियातील हे दोन्ही शक्तीशाली देश रशियाचे जवळचे रणनितीक भागीदार आहेत असे पीपल्स डेली या वर्तमानपत्राने लिहिले आहे.

पीपल्स डेली हे चिनी सरकारचे मुखपत्र असून रशियाकडून आवश्यक युद्धसाहित्याची खरेदी करुन आपली लष्करी क्षमता अधिक बळकट करण्याचा भारताचा प्रयत्न सुरु असताना चिनी सरकारच्या मुखपत्रातून ही मागणी करण्यात आली आहे. इमर्जन्सीमध्ये खरेदी करण्यासाठी केंद्राने 500 कोटींचा निधी मंजूर केला आहे. लडाखमधील वादाच्या पार्श्वभूमीवर भारताला तात्काळ 30 फायटर विमाने खरेदी करायची आहेत. यामध्ये मिग 29 आणि सुखोई 30 विमानांचा समावेश आहे असे पीपील्स डेलीने फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे. दरम्यान पूर्व लडाखमधील सर्व संघर्ष क्षेत्रांतून आपापले सैन्य माघारी घेण्याबाबत भारत आणि चीन यांच्या लष्करी अधिकार्‍यांत 11 तासांच्या प्रदीर्घ चर्चेत मतैक्य झाले.

सोमवारी उशिरापर्यंत वरिष्ठ कमांडर्सची ही बैठक झाली. मात्र ही सैन्य माघार टप्प्याटप्प्याने किती कालावधीत घ्यावी, याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. दोन्ही देशांत गेल्या काही आठवडयांच्या संघर्षांनंतर थोडीशी सकारात्मक स्थिती निर्माण झाली असून सौहार्दपूर्ण वातावरणात सकारात्मक आणि रचनात्मक चर्चा झाली. त्यात पूर्व लडाखमधील भागातून सैन्य माघारीचे सोपस्कार ठरवण्यात आले. भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व 14व्या कोअरचे कमांडर लेफ्टनंट जनरल हरिंदर सिंग यांनी केले, चीनच्या बाजूने तिबेट लष्करी जिल्ह्याचे मेजर जनरल लिउ लिन यांनी चर्चेचे नेतृत्व केले.