ना रशिया, ना अमेरिका… पर्वतांवर भारतीय जवान करतात राज्य, चीनच्या मिलिट्री एक्सपर्टनं सांगितली ‘ही’ बाब

नवी दिल्ली : वृत्त संस्था – चीनच्या पिपल्स लिब्रेशन आर्मी (पीएलए) ची उपकरणे बनवणार्‍या एका लष्करी तज्ज्ञाने म्हटले आहे की, भारताजवळ उंचावर होणार्‍या लढाईसाठी जगातील प्रशिक्षित सर्वात मोठे आणि अनुभवी सैन्य आहे. यासोबत त्यांनी सांगितले की, पर्वतांवर तैनात भारतीय जवानांसाठी पर्वतारोहण एक खास स्किल आहे.

मॉडर्न वेपनरी मॅग्झीनचे वरिष्ठ संपादक हुआंग गूझी यांनी म्हटले की, सध्याच्या काळात पठारे आणि पर्वतांवर जगातील सर्वात अनुभवी सेन्य ना अमेरिका, ना रशियाकडे, ना कोणत्याही युरोपियन देशाकडे आहे, तर ते भारताकडे आहे. एक मोठे आणि डिफेन्स जर्नल म्हणून ओळखल्या जाणार्‍या या मॅग्झीनचा संबंध चीनची मालकी असणार्‍या चीन नॉर्थ इंडस्ट्रीज ग्रुप कॉर्पोरेशन लिमिटेडशी आहे, जो स्वताला पीएलएसाठी मॅकेनाईज विकास, डिजिटल आणि बौद्धिक उपकरण विकसित करण्यासाठी जबाबदार मुख्य व्यासपीठ म्हणून सादर करतो.

चीनमध्ये छापलेला अनोखा लेख

हा ग्रुप जगातील सर्वात मोठ्या डिफेन्स कॉन्ट्रॅक्टरपैकी एक आहे आणि तो राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्या ड्रीम प्रोजेक्ट बेल्ट अ‍ॅण्ड रोड इनिशिएटीव्हमध्ये सुद्धा सहभागी आहे. मॅग्झीनमध्ये हा लेख अशावेळी छापला गेला आहे, जेव्हा चीन आणि भारताच्या सैनिकांमध्ये एलएसीवर लडाखच्या पर्वतीय भागात तणावपूर्ण वातावरण आहे. द पेपर डॉट चायनामध्ये छापलेला हा लेख चीनी मीडियामध्ये भारतीय लष्कराबाबत लिहिलेला एक दुर्मिळ भाग आहे. सामान्यपणे चीनमध्ये लिहिले जाणारे लेख भारताच्या सीमेसह आपल्या क्षमतांचे ब्रँडिंग करण्यासाठी आणि अति राष्ट्रवादाचे सूर काढण्यासाठी लिहिले जातात.

प्रत्येक सैनिकासाठी गिर्यारोहण जरूरी स्किल

हुआंग यांनी लेखात लिहिले आहे, पर्वतांवर तैनात भारतीय लष्कराच्या प्रत्येक जवानासाठी गिर्यारोहण एक जरूरी स्किल आहे. एवढेच नव्हे, तर खासगी क्षेत्रातून सुद्धा मोठ्या संख्येने व्यवसायिक गिर्यारोहकांची भरती केलेली आहे. त्यांनी लिहिले आहे की, 12 डिव्हिजनमध्ये 2 लाखपेक्षा जास्त सैनिकांसह भारतीय पर्वतीय फोर्स जगातील सर्वात मोठी पर्वतीय सैन्य आहे.

सियाचिन ग्लेशियरवर आहेत भारताच्या शेकडो चौक्या

हुआंग यांनी म्हटले आहे की, 1970 पासून, भारतीय सैन्याने मोठ्या प्रमाणात पर्वतांवर तैनात सैन्याचा आकार आणि जवानांची संख्या वाढवली आहे. 50,000 पेक्षा जास्त जवानांचा एक माऊंटन स्ट्राइक फोर्स बनवण्याचीही योजना आहे. सियाचिन ग्लेशियरचे उदाहरण देताना त्यांनी लिहिले आहे की, भारतीय लष्कराने सियाचिन ग्लेशियर क्षेत्रात 5,000 मीटरपेक्षा जास्त उंच परिसरात 6,000 ते 7,000 जवानांच्या शेकडो चौक्या स्थापन केल्या आहेत. भारताची सर्वात उंच चौकी 6,749 मीटरवर आहे.

अत्याधुनिक शस्त्रांनी सज्ज आहेत जवान

या दरम्यान हुआंग यांनी हाय अल्टीट्यूडवर भारतीय लष्कराद्वारे वापरण्यात येणार्‍या शस्त्रांचाही उल्लेख केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, परदेशांकडून खरेदी केलेली आणि डिआरडीओमध्ये विकसित केलेली भारताकडे अशी शस्त्रास्त्र आहेत, जी डोंगराळ भाग आणि पर्वतांवर वापरली जाऊ शकतात. भारतीय लष्कराने अमेरिकेकडून अत्याधुनिक शस्त्र खरेदी करण्यासाठी मोठी रक्कम खर्च केली आहे. यामध्ये एम 777 तोफा, जगातील सर्वात हलकी 155 एमएम होवित्झर, चिनूक हेलिकॉप्टर जे भारतीय तोफांना उचलण्यासाठी सक्षम आहे.