ED ची मोठी कारवाई ! हवाला व्यवसायात सहभागी असणार्‍या 2 ‘चिनी’ नागरिकांना अटक

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : अंमलबजावणी संचालनालया (ED) ने मनी लॉन्ड्रिंगच्या आरोपाखाली दोन चिनी नागरिकांना अटक केली आहे. चार्ली पेंग आणि कार्टर ली अशी त्यांची नावे आहेत. हे दोन चिनी नागरिक दिल्लीत वास्तव्य करून चिनी कंपन्यांकरिता प्रचंड मोठा हवाला रॅकेट चालवत होते आणि भारत सरकारला कोट्यावधींचा महसूल तोटा पोहोचवत होते. गेल्या वर्षी आयकर विभागाने चार्ली पेंगच्या ठिकाणांवर छापे टाकले होते. यानंतर दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने देखील चार्ली पेंगवर एफआयआर दाखल केला आहे.

ईडीने चार्लीविरूद्ध ऑगस्टमध्येच मनी लॉन्ड्रिंगचा खटला दाखल केला होता, इतक्या दिवसांपासून ईडी चार्ली पेंगच्या सर्व संशयास्पद व्यवहारांची चौकशी करत होती. चौकशीदरम्यान समोर आले की चार्ली पेंग हा केवळ भारतात हवाला व्यवसायातच सामील नव्हता तर तिबेटी धर्मगुरू दलाई लामा यांची हेरगिरी देखील करीत होता.

चार्ली पेंग बनावट कंपन्या तयार करून हवाला नेटवर्क चालवत होता. दिल्ली एनसीआरची सायबर सिटी गुरुग्रामच्या सेक्टर 59, गोल्फ कोर्स रोड स्थित पर्म स्प्रिंग प्लाझाच्या पत्त्यावर चार्लीने इनविन लॉजिस्टिक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची नोंदणी केली होती. परंतु प्लाझाच्या मॅनेजरच्या म्हणण्यानुसार येथे चीनची कोणतीही कंपनी नव्हती. अशाच प्रकारे अनेक बनावट पत्त्यांद्वारे चार्ली शेल कंपन्यांचे संचालन करून पैशाची देवाण-घेवाण करत होता. दिल्ली आणि गुरुग्राममधील सर्व पत्त्यांबाबतही तपास यंत्रणांनी चार्लीला विचारपूस केली आहे, ज्यांच्या आधारेच त्याने त्याचे आधार कार्ड बनवले आणि भारतात आपल्या बनावट कंपन्या रजिस्टर्ड केल्या.

दिल्ली पोलिसांच्या म्हणण्यानुसार, चार्ली पेंगने हवालामार्फत जी रक्कम मागवली ती रक्कम तिबेटियांना देण्यात आली आणि या रकमेचा उपयोग हेरगिरी करण्यासाठी करण्यात आल्याचा संशय आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आयकर विभागाने त्यांना सुमारे 2 डझन तिबेटी नागरिकांची नावे दिली आहेत, ज्यात काही लोक दिल्लीचे असून उर्वरित लोक दक्षिण भारतात वास्तव्यास असल्याची माहिती मिळाली आहे. यांच्यासोबत चार्ली पेंगने देवाण-घेवाण केली आहे.