देशात ‘ड्रॅगन’च्या विरोधात संताप, दिल्लीतील 3000 हॉटेल-गेस्ट हाऊसमध्ये आता चिनी नागरिकांना ‘No-Entry’

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : भारत आणि चीनमधील तणाव वाढतच आहे. गलवान खोऱ्यात हिंसक संघर्षानंतर भारतातील लोक चीनप्रती आक्रमक झाले आहेत. त्याचवेळी आता चिनी नागरिकांना दिल्लीतील हॉटेल आणि अतिथीगृहात राहू न देण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे.

कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (कॅट) च्या चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याच्या आवाहनावर दिल्ली मधील बजेट हॉटेल्सची संघटना दिल्ली हॉटेल अँड गेस्ट हाऊस ओनर्स असोसिएशनने (धुर्वा) एक मोठा निर्णय घेतला आहे. संघटनेने घोषित केले आहे की चीनच्या कुरघोड्या पाहता हा निर्णय घेण्यात आला आहे की हॉटेल्स आणि गेस्ट हाऊसमध्ये आतापासून कोणत्याही चिनी नागरिकाला थांबू दिले जाणार नाही.

दिल्लीमध्ये जवळपास 3000 बजेट हॉटेल आणि गेस्ट हाऊस आहेत. ज्यामध्ये जवळपास 75 हजार खोल्या आहेत. ही माहिती देताना दिल्ली हॉटेल अँड गेस्ट हाऊस ओनर्स असोसिएशनचे सरचिटणीस महेंद्र गुप्ता म्हणाले की, चीन ज्या पद्धतीने भारताशी कृत्य करत आहे आणि ज्या प्रकारे हिंसक चकमकीत भारतीय सैनिक शहीद झाले, त्या कारणामुळे दिल्लीतील सर्व हॉटेल व्यावसायिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

ते म्हणाले की, सीएटी (CAT) ने देशभरातील चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्यासाठी जी मोहीम राबविली आहे, त्यात दिल्लीतील हॉटेल आणि गेस्ट हाऊसचे व्यापारीदेखील सहभागी होतील आणि ते पाहताच आम्ही हा निर्णय घेतला आहे की आतापासून दिल्लीच्या कोणत्याही बजेट हॉटेल किंवा गेस्ट हाऊसमध्ये चिनी व्यक्ती ठेवली जाणार नाही.

बर्‍याच वर्गातील लोकांना या मोहिमेत जोडले जाईल

कॅटचे राष्ट्रीय सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल यांनी या निर्णयाचे स्वागत करत असे सांगितले की, देशातील विविध विभागातील लोक कॅटद्वारे सुरू केलेल्या चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याच्या मोहिमेत सामील होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. ते म्हणाले की या संदर्भात कॅट आता वाहतूक, शेतकरी, फेरीवाले, लघु उद्योग, ग्राहक, स्वयं उद्योजक, महिला उद्योजकांच्या राष्ट्रीय संस्थांशी संपर्क साधून त्यांना या मोहिमेत जोडतील.