चीनच्या राष्ट्राध्यक्षांचा सैन्याला आदेश, म्हणाले – ‘युध्दासाठी तयार रहा’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारत आणि चीनचे सैनिक गेल्या काही महिन्यांपासून पूर्व लडाख सीमेवर आमने सामने उभे ठाकले असून दोन्ही देशांदरम्यान तणावपूर्ण अशी परिस्थिती उद्भवली आहे. या स्थितीच्या अनुषंगाने चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी पीपल्स लिबरेशन आर्मीच्या सैनिकांना युद्धासाठी सज्ज राहण्याचे फर्मान सोडलं आहे. देशावर पूर्णपणे निष्ठावान राहण्याचे जिनपिंग यांनी सांगितलं आहे.

चीनचा भारत, अमेरिका आणि दक्षिण चीन सागरातील अन्य देशांसोबत वाद सुरु आहे. त्या पार्श्वभूमीवर मंगळवारी जिनपिंग यांनी गुआंगडोंग या चीनच्या तळाला भेट दिली. त्यावेळी त्यांनी प्रचंड सतर्क रहा आणि युद्धाच्या तयारीवर ऊर्जा केंद्रित करा, असे आवाहन आपल्या सैनिकांना केले आहे. मात्र, त्यांनी हे वक्तव्य कोणत्या देशांबाबत संबोधून केलं आहे, ते अजून स्पष्ट झालं नाही.

जून महिन्यात गलवान खोऱ्यात भारत आणि चीन सीमेवर दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये रक्तरंजित संघर्ष झाला होता. त्यामध्ये भारताचे २० जवान शहीद झाले तर चीनचे ४० पेक्षा अधिक सैन्य ठार झाल्याने प्रचंड तणावपूर्ण अशी स्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर पँगाँग टीएसओ सरोवर परिसरात गोळीबाराच्या घटना घडल्या आहेत. चीनची कुठलीही दादागिरी सहन न करता, भारतानेही प्रत्येकवेळी चीनला त्याच भाषेत प्रत्युत्तर दिले आहे. दक्षिण चीन सागरात अमेरिकेसोबत त्यांचा वाद सुरु आहे.

भारताने पाण्याखालून चाल करु नये, म्हणून चीनने…
पूर्व लडाखमध्ये सीमेवरून तणावपूर्ण स्थिती उद्भवल्यापासून चीनची पीपल्स लिबरेशन आर्मी पँगाँग टीएसओच्या परिसरावर हायस्पीड गस्ती नौकांद्वारे लक्ष ठेवून आहे. चीनकडून टाइप ३०५ आणि टाइप ९२८ डी बोटींचा वापर करण्यात येतो. या नौका स्वीडीश सीबी-९० ची कॉपी आहे.

तद्वतच या परिसरात फक्त भूभागावरुन नव्हे, तर भारत पाण्याखालून हल्ला करु शकतो या भीतीने चीन यावरही लक्ष ठेवून आहे. त्यासाठी जगभरातील नौदल ज्या पाणबुडी विरोध तंत्रज्ञानाचा उपयोग करतात, त्याचा वापर सध्या चीनकडून करण्यात येत आहे. ताज्या प्रसिद्ध झालेल्या उपग्रह छायाचित्रांवरुन याबाबत खुलासा झाला आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने हे वृत्त दिले आहे.