दिवाळीत चिनी वस्तूंवरील बहिष्कारामुळे होतय नुकसान, चिनची आगपाखड

भारत-चीन सीमा वादाचा परिणाम स्वस्त चिनी उत्पादनांच्या विक्रीवरही होत आहे. सध्या भारतात अनेक दुकानदार आणि किरकोळ विक्रेते दिवाळीशी संबंधित चिनी उत्पादनांवर बहिष्कार घालत आहेत. चीनचा देखील यामुळे जळफळाट होत आहे. चीन कम्युनिस्टच्या पार्टीच्या सरकारचे मुखपत्र ग्लोबल टाइम्सने त्याबद्दल एक लेख प्रसिद्ध केला आहे.

या लेखाचे शीर्षक आहे – गाईच्या शेणापासून बनविलेल्या दिव्यांमुळे भारतात चांगली दिवाळी होईल का ? ग्लोबल टाईम्सने लिहिले आहे की, भारत-चीन संबंध यावर्षी वाईट टप्प्यातून जात आहेत आणि हे प्रत्येक वेळीच्या तुलनेत चिनी मालावरी सामुहिक बहिष्कारावरून सहज समजू शकते. पण यामुळे चिनी व्यावसायिकांपेक्षा भारतीयांचे अधिक नुकसान होईल, असा दावा या वर्तमानपत्राने केला आहे. ग्लोबल टाइम्सने लिहिले आहे की गरीब भारतीयांना दिवाळी साजरी करणे अवघड होईल.

या वृत्तपत्राने काही अहवालांचा उल्लेखही केला आहे ज्यात असे म्हटले आहे की, दिवाळीच्या हंगामात जयपूरच्या व्यापार्‍यांनी चिनी दिवे व इतर वस्तू विक्री न करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच भारतीय ग्राहकही भारतात तयार केलेल्या वस्तूंवर जास्त पैसे खर्च करण्यास तयार आहेत.

ग्लोबल टाइम्सने लिहिले आहे की, काही भारतीय वृत्तपत्रांनी असा दावा केला आहे की चिनी उत्पादनांवर बहिष्कार टाकल्यामुळे चीनला सुमारे 400 अब्ज रुपयांचे नुकसान होऊ शकते. या विचारातून असे दिसून येते की चीनच्या निर्यातीच्या शक्तीविषयी भारतीयांना पुरेशी माहिती नाही. ग्लोबल टाईम्सने लिहिले की, दिवाळी हा भारतातील एक प्रमुख सण आहे परंतु चीनला किरकोळ वस्तूंच्या निर्यातीत भारताचा वाटा खूपच कमी आहे. चीनचा झेझियांग प्रांत स्मॉल कमोडीटीत जगातील सर्वात मोठे केंद्र आहे. ख्रिसमसच्या तुलनेत दिवाळीतील व्यापाराचा स्तर काहीच नाही. ‘

महामारी आणि चीन-भारत संघर्षानंतर अनेक चीनी कंपन्यांनी तोटा टाळण्यासाठी आपला व्यवसाय देशांतर्गत बाजारपेठा आणि शेजारच्या देशांकडे वळविला, असे ग्लोबल टाईम्सने लिहिले आहे. ज्या कंपन्या भारतात व्यवसाय करीत आहेत त्यांनी कोणत्याही प्रकारचा धोका टाळण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत. भारताच्या व्यापार धोरणामुळे किंवा दरांमुळे अनेक कंपन्यांनी आगाऊ रक्कम घेतली आहे. या सर्व कारणांमुळे, यंदाच्या दिवाळीत चिनी उत्पादने कमी दिसतील आणि भारतीय ग्राहकांनाही त्याचा परिणाम हळूहळू जाणवेल.

या लेखात असे लिहिले आहे की, काही लोक भारतात तयार केलेल्या वस्तूंसाठी जास्त पैसे देण्यास तयार होऊ शकतात जेणेकरुन देशातील उत्पादन क्षेत्राला आधार मिळेल. तथापि, बरेच ग्राहक या परिस्थितीत नसतील आणि त्यांना केवळ खराब दिवे लावावे लागतील. चीनच्या आधुनिक उत्पादनांच्या बहिष्काराची किंमत म्हणून अनेक भारतीयांना जुन्या काळातील दिवे वापरावे लागतील, असे या वृत्तपत्राने लिहिले आहे.

शेवटी ग्लोबल टाइम्सने धमकी दिल्याप्रमाणे लिहिले आहे की, चिनी उत्पादने नेहमीच भारतात लक्ष्य केली जातात, परंतु एक गोष्ट लक्षात ठेवणे आवश्यक आहे की चीन-भारत व्यापार परस्पर हितसंबंध आणि फायद्यांवर अवलंबून आहे. जर द्विपक्षीय संबंधांना काही नुकसान होत असेल तर त्याचा परिणाम औद्योगिक साखळी आणि ग्राहक बाजारावरही होईल. चीनी निर्यातदार नक्कीच अस्वस्थ होतील पण भारतीय ग्राहकांच्या हिताचेही नुकसान होईल.

ग्लोबल टाईम्सने लिहिले आहे की, जर भारताला चिनी वस्तू वस्तू मेड-इन-इंडिया म्हणून रिप्लेस करायच्या असतील जुन्या पद्धतीचे दिवे वापरण्याचा आग्रह करण्यापेक्षा त्यांना अधुनिक उत्पादने बनवण्यासाठी मेहनत करावी लागेल. मात्र, चीन ज्या मातीच्या दिव्यांवर टीका करत आहे, ते खूपच सुंदर दिसतात. अयोध्येत 14 वर्षांच्या वनवासानंतर श्री राम परत आल्यानंतरही अयोध्येतील लोकांनी दीप प्रज्वलित केले होते.