चीननं पुन्हा एकदा ‘माउंट एव्हरेस्ट’चं केलं ‘मोजमाप’, उंची 4 मीटर कमी असल्याचा केला दावा !

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्टची उंची चीनने पुन्हा मोजली आहे. जेणेकरून योग्य उंचीबद्दल ते संपूर्ण जगास सांगू शकतील. यासाठी बुधवारी तिबेटमार्गे चीनचे 8 सदस्यीय सर्वेक्षण पथक एव्हरेस्टच्या शिखरावर पोहोचले आहे. चीनच्या मते, एव्हरेस्टची उंची 8844.43 मीटर आहे. तर नेपाळने मोजलेली उंची 8848.13 मीटर आहे. जगातील सर्वोच्च शिखराची उंची मोजण्यासाठी 1 मेपासून चीनने सर्वेक्षण सुरू केले. एव्हरेस्टच्या उंची संदर्भात चीनचा असा विश्वास आहे की, नेपाळने उंची अचूकपणे मोजली नाही.

माहितीनुसार नेपाळच्या याच चुकांमुळे चीन एव्हरेस्टची उंची मोजण्यासाठी पुन्हा तयार झाला. चीनच्या शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की, एव्हरेस्टची उंची मोजली तर मानवाची समज आणखी वाढेल. लोक वैज्ञानिक विचारसरणीकडे वाटचाल करतील. आतापर्यंत चिनी सर्वेक्षणकर्त्यांनी एव्हरेस्टची उंची मोजण्याचे सहा चक्र पूर्ण केले आहेत. 1975 आणि 2005 मध्ये दोनदा शिखराची उंची अनुक्रमे 8488. 13 मीटर आणि 8,844.43 मीटर नोंदविली गेली. चीनच्या सर्वेक्षणकर्त्यांनी 20 चौरस मीटर रुंदीच्या शिखरावर सर्व्ह मार्कर देखील लावले आहेत. माउंट एव्हरेस्टला तिबेटियन भाषेत माउंट कोमोलॅन्ग्मा म्हणतात. माउंट एव्हरेस्टच्या सीमेवरुन चीन आणि नेपाळ यांनी 1961 मध्ये चर्चा करून हा वाद संपविला. बरेच गिर्यारोहक तिबेटच्या बाजूने एव्हरेस्ट चढतात. कारण नेपाळमध्ये सुविधा कमी आहेत.

दरम्यान, कोरोना विषाणूच्या या वातावरणातही चीन आपल्या नसत्या उठाठेवींपासून सुधारत नाही. त्याने जगातील सर्वोच्च शिखरावर 5G नेटवर्क स्थापित केले आहे. याबद्दल तज्ज्ञ चिंतेत आहेत. तज्ञांचा असा दावा आहे की, 5 जी नेटवर्कद्वारे चीन भारतासह शेजारच्या अनेक देशांवर नजर ठेवू शकतो. अशा इतर बर्‍याच गोष्टी केल्या जाऊ शकतात, जे धोकादायक असल्याचे सिद्ध होऊ शकते. माउंट एव्हरेस्टवर चीनने 5300 मीटर आणि 5800 मीटर उंचीवर 5G इंटरनेट नेटवर्क स्थापित केले आहे. एव्हरेस्टवर तीन 5 जी नेटवर्क स्टेशनची निर्मिती करण्यात आली आहे. तिसरे स्टेशन 6500 मीटर उंचीवर तयार केले आहे. हे चायना मोबाइल आणि हुआवे कंपनीने मिळून बनविले आहे. चीनचा दावा आहे की, आता एव्हरेस्टवर प्रति सेकंद 1 जीबी इंटरनेटची गती उपलब्ध होईल. असे मानले जाते की, एव्हरेस्टवर तीन 5 जी नेटवर्क स्टेशन तयार करण्यासाठी चीनने सुमारे 4.20 लाख डॉलर म्हणजेच 3.17 कोटी रुपये खर्च केले आहेत.