तब्बल 25 लाखांहून जास्त डाउनलोड झालेय ‘मेड इन इंडिया’ अ‍ॅप, TikTok ला तगडी ‘टक्कर’

पोलिसनामा ऑनलाईन टीम – चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याच्या मोहिमेचा एका मेड इन इंडिया मोबाइल अ‍ॅपला चांगलाच फायदा झाला आहे. शॉर्ट व्हिडिओ मेकिंग सेगमेंटमधील आघाडीच्या टिकटॉक या चिनी अ‍ॅपला पर्याय म्हणून ‘चिंगारी’ अ‍ॅप गेल्या काही दिवसांपासून चांगलंच लोकप्रिय ठरत आहे. आतापर्यंत 25 लाखांहून जास्त वेळेस हे अ‍ॅप डाउनलोड झाले आहे.

भारतीय पर्याय असलेले हे अ‍ॅप छत्तीसगडचे आयटी प्रोफेशनल्स आणि ओडिशा व कर्नाटकच्या डेव्हलपर्सनी बनवले आहे. हे अ‍ॅप बनवण्यासाठी जवळपास दोन वर्षांचा कालावधी लागला. खास भारतीय युजर्सच्या गरजा आणि आवड लक्षात घेऊ हे अ‍ॅप डिझाइन करण्यात आले आहे, असे भिलाईमधील रहिवासी आणि चिंगारी अ‍ॅपचे चीफ ऑफ प्रोडक्ट सुमित घोष यांनी सांगितले आहे. चिंगारी अ‍ॅप नोव्हेंबर 2018 मध्ये गुगल प्ले स्टोअरवर अधिकृतपणे आले होेते.

पण काही दिवसांपासून भारतात चिनीवर बहिष्कार करण्याची मागणी जोर धरु लागल्यानंतर चिंगारीच्या डाउनलोडिंगमध्ये मोठी वाढ झाली. आम्हाला भारतीय युजर्सचा शानदार प्रतिसाद मिळत आहे. काही दिवसांमधील आकडेवारीनुसार हे अ‍ॅप 25 लाखांहून जास्त डाउनलोड झाल्याचे सुमितने सांगितले आहे. विशेष म्हणजे या अ‍ॅपने आता प्ले स्टोअरमध्ये फ्री अ‍ॅप्सच्या टॉप चार्टमध्ये जागा मिळवली आहे. ओडिशाच्या विश्वात्मा नायक आणि कर्नाटकच्या सिद्धार्थ गौतम यांनी हे अ‍ॅप डेव्हलप केले आहे. भारतात तयार केलेले हे अ‍ॅप टिकटॉकला थेट टक्कर देत आहे.