थेऊर ग्रामपंचायतीवर पुन्हा चिंतामणी ग्रामविकास पॅनेलची सत्ता; सरपंच शीतल काकडे व उपसरपंच अप्पासाहेब काळे

थेऊर : पोलीसनामा ऑनलाइन – अष्टविनायकापैकी एक तीर्थक्षेत्र असलेल्या थेऊर गावच्या सरपंचपदी शीतल शरद काकडे तर उपसरपंच पदी अप्पासाहेब रामचंद्र काळे यांची निवड झाली. ग्रामपंचायत सभागृहात पार पडलेल्या निवड प्रक्रियेत ही निवड झाली अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी राजेश खंदारे यांनी दिली. यावेळी ग्रामविकास अधिकारी सयाजी क्षीरसागर यांनी सहाय्यक म्हणून काम पाहिले.

मागील महिन्यात पार पडलेल्या ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूकीत यशवंत सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक पांडूरंग रामचंद्र काळे व प्रभाकर काकडे, राज्य साखर कामगार संघटनेचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे व माजी पंचायत समिती सदस्य हिरामण काकडे याच्या नेतृत्वाखाली चिंतामणी ग्रामविकास पॅनेलने प्रभाग दोन मधील दोन जागी प्रभाग तीन मध्ये दोन जागी तसेच प्रभाग चार मधील तीन व प्रभाग सहा मधील तीन जागी अशा दहा जागी विजय मिळवत आपली सत्ता कायम ठेवली तर माजी सरपंच महादेव काकडे व नवनाथ काकडे तसेच पंचायत समितीच्या माजी सभापती चंद्रभागा काकडे व दत्तात्रय कुंजीर यांच्या नेतृत्वाखालील महातारीआई ग्रामविकास पॅनेलने प्रभाग एक मध्ये तीन प्रभाग दोन मध्ये एक व प्रभाग पाच मध्ये तीन अशा सात जागी विजय मिळविला. सरपंच व उपसरपंच ही दोन्ही पदे चिंतामणी ग्राम विकास पॅनलकडे राहणार हे निश्चित होते.

सरपंच पदासाठी शीतल काकडे व गणेश गावडे यांचे तर उपसरपंच पदासाठी अप्पासाहेब काळे व संतोष काकडे असे अर्ज दाखल झाले यावर संतोष काकडे यांनी गुप्त मतदान घेण्याची मागणी केली त्यानुसार मतदान घेण्यात आले. यामध्ये शीतल काकडे यांना १० मते तर गणेश गावडे यांना ७ मते मिळाली म्हणून तर उपसरपंचपदासाठी अप्पासाहेब काळे यांना १० मते आणि संतोष काकडे यांना ७ मते मिळाली. नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंच यांचा राजेश खंदारे यांनी सत्कार केला. यावेळी महाराष्ट्र राज्य साखर कामगार संघाचे तात्यासाहेब काळे, माजी पंचायत समिती सदस्य हिरामण काकडे उपस्थित होते.