गायीच्या शेणापासून बनलेली चीप कमी करेल मोबाईलचं रेडिएशन , राष्ट्रीय कामधेनु आयोगाच्या अध्यक्षांनी सांगितलं

नवी दिल्लीः वृत्तसंस्था – असे मानले जाते की, देसी गायीचे शेण आणि तिच्या मूत्रामध्ये अनेक औषधी गुणधर्म आढळतात. त्याच बरोबर राष्ट्रीय कामधेनु आयोगाचे अध्यक्ष वल्लभभाई कथिरिया म्हणाले आहेत की, देसी गायीचे शेण आता धोकादायक मोबाइल रेडिएशनपासून तुमचे रक्षण करेल. सोमवारी त्यांनी बनविलेल्या गोबर (चिप) चे अनावरणही केले. या चिपबद्दल असा दावा केला जात आहे की, या चिपमुळे मोबाइलमधून निघणाऱ्या रेडिएशनचे प्रमाण कमी होते.

शेणापासून बनवलेल्या उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘कामधेनु दिवाळी’ कार्यक्रमाच्या शुभारंभाच्या वेळी वल्लभभाई कथिरिया यांनी या गोष्टी सांगितल्या. ‘गौसत्व कवच’ चिपबद्दल ते म्हणाले की, ‘ही एक रेडिएशन चिप आहे, जी तुम्ही तुमच्या मोबाइलमध्ये ठेवू शकता. तुम्हाला आजारपणापासून वाचायचे असेल असेल तर याचा वापर नक्कीच करा. ‘गौसत्व कवच’ राजकोटच्या श्रीजी गौशालाने विकसित केले आहे.

या चिपमुळे रेडिएशन 90 टक्के कमी होईल. सुरुवातीच्या चाचणीत ते यशस्वी झाले आहे. जुन्या मेमरी कार्डच्या आकाराची ही चिपमध्ये गायीचे शेण भरले जाईल, जे तुम्हाला रेडिएशनपासून वाचवेल.

कथिरियांनी सांगितले की, 500 हून अधिक गौशाला अशी अँटी रेडिएशन चिप्स बनवित आहेत. ते 50 ते 100 रुपयांमध्ये खरेदी करता येतील. एक गौशाला अमेरिकेतही अशी चिप निर्यात करीत आहे. हे तेथे सुमारे 10 डॉलर्सवर विकले जात आहे.

‘गौसत्व कवच’ विषयी वल्लभभाई कथिरिया पुढे म्हणाले की, ‘काही दिवसांपूर्वी अक्षय कुमार म्हणाले की, त्यांनी गायीचे शेण खाल्ले आहे. आपण ते खाऊ शकता, कारण ते एक औषध आहे. लोक औषध म्हणून गोमूत्रचा वापर करतात. ते म्हणाले की, राष्ट्रीय कामधेनू आयोग अशा गोष्टींबद्दल संशोधन करत आहे, ज्याला लोक मिथक मानतात. यावर लवकरच एक प्रकल्प सुरू केला जाईल.

चिपवर काम करणाऱ्या तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, आत्तापर्यंत केलेल्या संशोधनात देसी गायीचे शेण मोबाईल रेडिएशनचे दुष्परिणाम रोखण्यासाठी प्रभावी असल्याचे आढळले आहे. चिप अशा प्रकारे तयार केली गेली आहे की, ज्यात शेण भरल्यानंतर त्याचा दुर्गंध येणार नाही. हे मोबाइल फोनच्या मागील बाजूस लावले जाईल. चिप गोबरने भरली जाईल जे एका आठवड्यापासून ते रेडिएशनपासून वाचवेल. यानंतर शेण बदलले पाहिजे.