वडिलांना श्रद्धांजली वाहण्यासाठी चिराग पासवान यांची प्रॅक्टिस, Video व्हायरल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बिहारमध्ये विधानसभा निवडणूकीची ( Bihar Election) रणधुमाळी सुरु आहे. आज पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडत असून लोक जनशक्ति पार्टीचे नेते चिराग पासवान ( Chirag Paswan) एका वेगळ्याच गोष्टीमुळे चर्चेत आले आहेत. त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर ( Social Media) जोरदार व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये चिराग हे त्यांचे वडील स्वर्गीय रामविलास पासवान ( Ramvilas Paswan) यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी भाषणाची प्रॅक्टिस करत असताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री नितीश कुमार ( Nitish Kumar) यांच्यावर टीका करतानाचा त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता.सध्या त्यांचा हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. चिराग पासवान नाटक करत असल्याचा आरोप करत काँग्रेसने ( Congress) हल्लाबोल केला आहे. व्हिडीओमध्ये चिराग हे रामविलास पासवान यांच्या फोटो समोर उभे राहून भाषणाची तयारी करत होते. चिराग यांच्या आजुबाजूला कॅमेरामन आणि इतर काही लोकं होती. त्यांना ते काही सूचना करत होते. काही ओळी म्हटल्यानंतर ते पुढे काय म्हणायचं ते विसरले आणि पुन्हा शूट करण्यास सांगू लागले. त्यानंतर काँग्रेसच्या नेत्यांनी हे लज्जास्पद असल्याचे म्हटले आहे.

उत्तर प्रदेश काँग्रेसच्या नेत्या पंखुरी पाठक 9 Pankhuri Pathak) यांनी आपल्या ट्विटर ( Twitter) अकाऊंटवरून हा व्हिडीओ ट्विट केला आहे. “अशा नाटकी लोकांमुळेच राजकारण हे बदनाम झालं आहे. लोकांनी जागरूकपणे आपला लोकप्रतिनिधी निवडून अशा लोकांना राजकारणाच्या बाहेरच काढलं पाहिजे” असे म्हणत पंखुरी पाठक यांनी चिराग पासवान यांच्यावर टीका केली आहे.दरम्यान, चिराग पासवान यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर टीका केली होती. यावेळी त्यांनी “लोक जनशक्ती पार्टी ( Lok Janshakti Party) जर सत्तेत आली तर नितीश कुमार हे गजाआड असतील” असं म्हटलं होतं. त्याचबरोबर बिहारमध्ये दारूबंदी अयशस्वी ठरली आहे. अवैध दारूची मोठ्याप्रमाणावर विक्री होत असल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे भाजप ( BJP) आणि लोकजनशक्ती पक्षाला मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केलं आहे.