चित्रा वाघ यांचा वनमंत्री संजय राठोड यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाल्या…

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिलेल्या पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी भाजप नेत्या चित्रा वाघ आक्रमक झाल्या आहेत. या प्रकरणात वनमंत्री आणि शिवसेना नेते संजय राठोड यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी वाघ यांनी केली आहे. दरम्यान दुसरीकडे चित्रा वाघ यांचा पती किशोर वाघ यांच्याविरोधात बेहिशोबी संपत्ती बाळगल्या प्रकरणी एसीबीने गुन्हा दाखल केल्याने अनेक तर्कवितर्क लढवले जात आहे.

चित्रा वाघ यांनी शनिवारी (दि. 27) नाशिकमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, यवतमाळला ज्या ठिकाणी गर्भपातासाठी पुजा गेली अशी बातमी आहे, त्यासंदर्भात मी यवतमाळच्या पोलीस अधिक्षकांना बोलले आहे. त्या दिवशी रुग्णालयात जे डॉक्टर होते त्यांनी पुजाला ट्रीटमेंट दिली नाही, दुसऱ्या डॉक्टरने येऊन पुजाला ट्रीटमेंट दिली, मग त्या डॉक्टरची चौकशी केली का, असा प्रश्न मी त्यांना विचारला, त्यावर त्यांनी सांगितले की, पुण्याची टीम इथे तपासासाठी आली होती, त्यांनी आमच्याकडे कुठलीही विचारणा किंवा मदत मागितली नाही, त्यांची टीम आली आणि तपास करुन गेली, यवतमाळच्या एसपींना सुद्धा इतक्या मोठ्या घटनेबाबत पुणे पोलिसांनी सांगितल नसल्याचा दावा त्यांनी केला आहे.