‘तुमचे दात जास्तच दिसतायत, सांभाळून ठेवा कधी घशात जातील याचा नेम नाही’, भाजप आणि राष्ट्रवादीच्या 2 महिला नेत्यांमध्ये ट्विटर’वॉर’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्यावर दाखल झालेल्या बलात्काराचा गुन्हा आणि यासंबंधीच्या चौकशी प्रकरणावरून भाजप नेत्या चित्रा वाघ आणि राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या ट्विटर वॉर सुरु झाले आहे. यापूर्वी देखील या दोन महिला नेत्यांमध्ये ट्विरवॉर झाले होते.


रुपाली चाकणकर यांनी ट्विट करून भाजपचे आमदार नरेंद्र मेहता आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. आपल्या पक्षाच्या या विकृती आपल्या सगळ्यांना भाजपचे संस्कार दाखवतात… की येथेही आपण आरोपीला क्लिन चीट देणार आहात ? असा सवाल करत त्यांनी फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. तसेच चित्रा वाघ यांना देखील यामध्ये सहभागी करून घेत आपण या प्रकरणी एवढ्या शांत का ? असा प्रश्नही केला आहे.


चाकणकर यांच्या ट्विटला चित्रा वाघ यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ज्याने गुन्हा केला असेल त्याला त्याची शिक्षा मिळेलच. नेत्यांच्या चुकीच्या गोष्टीचं समर्थन मी या अगोदरही केलं नाही आणि आताही करत नाही. आणि इथून पुढच्या काळातही मी चुकीचे समर्थन करणार नाही असे वाघ यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.


चाकणकर यांनी चित्रा वाघ यांना प्रत्युत्तर देताना म्हटले की, चित्रा वाघ तुमचे खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे आहेत का ? असे ट्विटकरून प्रश्न विचारला आहे. त्यावर तुमचे दात जास्तच दिसताहेत ते सांभाळून ठेवा कधी घशात जातील याचा नेम नाही, असं सणसणीत उत्तर चित्रा वाघ यांनी चाकणकर यांना दिले आहे.