चित्रा वाघ यांनी मॉर्फ केलेल्या त्या फोटोविरोधात केली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाने महाराष्ट्राचे राजकारण जबरदस्त तापले आहे. या मुद्द्यावर भाजप नेत्या चित्रा वाघ, वनमंत्री संजय राठोड यांचे नाव घेत सातत्याने राज्य सरकारवर निशाणा साधत आहेत. मात्र, आता राठोडांसोबत त्यांचेच मॉर्फ केलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी संजय राठोड यांच्यावर आक्रमकपणे टीका करणाऱ्या भाजपा महिला नेत्या चित्रा वाघ यांचा फोटो मॉर्फ केल्याप्रकरणी राजकारण जबरदस्त तापले होते. या प्रकरणी चित्रा वाघ यांनी आज बीकेसी पोलीस ठाण्यात जाऊन सायबर विभागाच्या पोलीस उपायुक्त रेश्मी करंदीकर यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. फोटो व्हायरल झाल्यानंतर चित्रा वाघ यांनी फोटोंसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे तक्रार केली होती. आता या प्रकारात मुंबई पोलिसांकडे कारवाईची मागणी केली आहे.

याप्रकरणी त्यांनी मुंबई पोलिसांकडे कारवाईची मागणी केली होती असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडेही तक्रार केली होती. याशिवाय त्यांनी दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांनाही माहिती दिली. दरम्यान, व्हायरल झालेल्या या मॉर्फ फोटोत चित्रा वाघ आणि संजय राठोड अगदी जवळ उभे असल्याचे दिसत आहेत.

आवाज उठवणे गुन्हा आहे का ?
“महाराष्ट्रात अन्यायाविरोधात आवाज उठवणे आता गुन्हा झाला आहे का? असे मला विचारायचे आहे. जे काम पोलिसांचे आहे, ते पोलिसांनी केले असते, जे काम सरकारचे आहे, ते काम सरकारने केले असते. तर आम्हाला त्या ठिकाणी बोलण्याची काय गरज होती? स्वतः काही करायचे नाही आणि अशा पद्धतीने फौज उभी करायची आणि हे तुम्ही बघितले मॉर्फ केलेले फोटो काय सिद्ध करण्याचा प्रयत्न करताय तुम्ही? असा प्रश्नही चित्रा वाघ यांनी विचारला आहे.

माझा गुन्हा काय ?
वाघ म्हणाल्या, मला सातत्याने हॅरेसमेंट आणि धमकीचे फोन येत आहेत. त्याचे स्क्रीन शॉर्ट काढून मी डीजींसह सर्वांना पाठवत आहे. मी मुंबईच्या बाहेर जात असल्याने, जोपर्यंत मी गुन्हा दाखल करत नाही, तोपर्यंत कारवाई होणार नाही. मग तोपर्यंत मी हे सगळं सहन करायचं का? आणि माझा गुन्हा काय, तर जिथे अन्याय झाला तिथे आवाज उठवत आहे. हा माझा गुन्हा आहे? असा सवालही त्यांनी यावेळी केला. याबाबत काळाचौकी पोलिसांनी चित्रा वाघ यांच्या घरी जाऊन याबाबत त्यांचा जबाब नोंदवला आहे.