मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महिलांना ’भयमुक्त महाराष्ट्राची’ ओवाळणी देणार का ? : चित्रा वाघ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महिला सक्षमीकरणाच्या, सशक्तीकरणाच्या नावावर महिलांची दिशाभूल करण्याचे काम ठाकरे सरकार करत आहे. राज्यातील महिलांना भाऊबीज सणानिमित्त भयमुक्त वातावरणाची ओवाळणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देणार का? असा प्रश्न भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी विचारला आहे. जळगाव जिल्ह्यातील पारोळा येथे बी.एस.सी च्या अंतिम वर्षात शिकणार्‍या तरुणीवर झालेला सामूहिक बलात्कार आणि राज्यातील वाढलेल्या महिला अत्याचाराच्या घटनांवरुन वाघ यांनी ठाकरे सरकारला धारेवर धरले.

जळगाव येथे महिला अत्याचारांवर घसा कोरडा होईपर्यंत बोंबा मारणारे महाआघाडीतील नेते गप्प का? राज्यातील महिला सुरक्षेसंदर्भात ते इतके गप्प का झालेत? असे प्रश्न उपस्थित करून चित्रा वाघ म्हणाल्या, जळगाव जिल्ह्यातील रावेरमध्ये बालिकेवर अत्याचार करुन भावंडाच्या हत्या करण्यात आली. ही घटना ताजी असताना आता पारोळा येथे एससी समाजाच्या मुलीवर सामूहिक बलात्कार करुन तिचा खून करण्यात आला. इतकी गंभीर घटना घडूनही राज्य सरकार गंभीर नाही.

चित्रा वाघ म्हणाल्या की, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, उस्मानाबादमध्ये महिलांवर अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत. मात्र राज्यातील महाविकास आघाडी सरकार त्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. राज्यात महिला आणि मुलींवर दररोज अत्याचारांच्या घटना घडत आहेत. महिलांवर बलात्कार, विनयभंग होत आहे.

त्या पुढे म्हणाल्या की, सरकारमधील नेते हाथरसच्या घटनेचा निषेध करतात, पण आपल्या राज्यातील घटनांवर बोलत नाहीत. महाराष्ट्र महिलांसाठी सुरक्षित नाहीत. राज्यातक्वारंटाईन सेंटरमध्ये महिलांवर अत्याचार होत आहेत. महिला आयोगाला अध्यक्ष दिला जात नाही. दिशा कायदा महाराष्ट्रत लागू केला जात नाही. माझे कुटुंब माझे जबाबदारी बोलून चालणार नाही, त्यावर कृती करावी लागेल, असे टिकास्त्र वाघ यांनी ठाकरे सरकारवर सोडले.