‘फोटोसेशन तीन तासात शक्य नाही म्हणून…’ चित्रा वाघ यांचा उद्धव ठाकरेंना टोला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – तौक्ते चक्रीवादळामुळे कोकणात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज कोकण दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी मला फोटो सेशन करण्यात रस नाही, कारण मी स्वत: फोटोग्राफर असल्याचे सांगत विरोधकांवर टीका केली. त्यांच्या टीकेला भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी प्रत्युत्तर दिले आहे. 3 तासाच्या कोकण दौऱ्यात मुख्यमंत्र्यांनी किती गावांना भेटी दिल्या कितींच सांत्वन केलं, हे सगळ कृपा करुन विचारु नका, अशी फिरकी त्यांनी घतेली.

चित्रा वाघ यांनी ट्विट करुन मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. त्या म्हणाल्या, देवेंद्रजी… काय राव तुम्ही… थेट दुष्काळीभागात लोकांच्या मदतीला पोहोचतां मग इथे मुख्यमंत्र्यांनाही निघावं लागतं ना, 3 तासाच्या कोकण दौऱ्यात त्यांनी किती गावांना भेटी दिल्या, कितींच सांत्वन केलं, हे सगळ कृपा करुन विचारु नका, आणि हो पर्यटन फोटोसेशन 3 तासात शक्य नाही म्हणून रद्द केलयं !, अशा शब्दात त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

केवळ ‘दर्शना’चा कार्यक्रम

मुख्यमंत्र्यांनी केलेल्या 4 तासांच्या कोकण दौऱ्यावर भाजपच्या इतर नेत्यांनी देखील टीका केली आहे. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी ‘केवळ दर्शनाचा कार्यक्रम’ असल्याची टीका केली आहे. दरेकर यांनी ट्विटमध्ये म्हटले की, कोकणात चक्रीवादळ नुकसानीची पाहणी ! विरोधी पक्ष नेते ‘तीन दिवस’, मुख्यमंत्री ‘तीन तास’, विरोधी पक्ष नेते कोकणवासीयांच्या बांधावर, उंबरठ्यावर जाऊन विचारपूस, मुख्यमंत्र्यांचा ‘केवळ दर्शनाचा कार्यक्रम’, अशा शब्दात दरेकरांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे.

काय म्हणाले उद्धव ठाकरे ?

विरोधकांच्या टीकेला उत्तर देण्यासाठी नाही, तर कोकणवासीयांना दिलासा देण्यासाठी चक्रीवादळग्रस्त भागाचा दौरा करत आहे. हेलिकॉप्टरमधून नाही, तर जमिनीवर उतरुन मी पाहणी करण्यासाठी आलो आहे, असे म्हणत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला लगावला. तसेच माझा दौरा चार तासांचा आहे. मला फोटोसेशन करण्यात रस नाही, कारण मी स्वत: फोटोग्राफर आहे, अशी टीका त्यांनी विरोधकांवर केली.