पतीविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर चित्रा वाघ यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या – ‘होय, शरद पवार माझा बापच आहे,…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री संजय राठोड यांच्याविरोधात आक्रमक झालेल्या भाजपा नेत्या चित्रा वाघ यांच्यासमोरील अडचणी आता वाढण्याची चिन्हे आहेत. बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. यावर नाशिकमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये चित्रा वाघ यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवरून ठाकरे सरकारला लक्ष्य केलं होतं.

‘२०१७ मध्ये जेव्हा पहिली एफआयआर दाखल झाली तेव्हा शरद पवारांनी मला बोलावून घेतलं. माहिती घेतली आणि सांगितलं की यात तुझ्या नवऱ्याचा काहीच दोष नाही. मला आज पवार साहेबांची खूप आठवण येतेय. होय शरद पवार माझा बापच आहे’, ही आठवण सांगत त्यांनी पुन्हा एकदा किशोर वाघ निर्दोष असल्याचे सांगितले. तसंच, नवऱ्याविरोधात एसीबीने दाखल केलेल्या गुन्ह्याबद्दल बोलताना चित्रा वाघ म्हणाल्या, की ‘एफआयआरची कॉपी माझ्या घरी पाठवायला तुमच्याकडची माणसं संपली का. माझ्या नवऱ्याने एक रुपया पण नाही घेतला.’ किशोर वाघ यांना एसीबीनं व्हॉट्सअॅपवरून नोटीस पाठवल्याचं त्या म्हणाल्या. त्याचवेळी त्यांच्यावर खोटा गुन्हा दाखल झाल्याचंही चित्रा वाघ यांनी सांगितलं. त्या पुढे म्हणाल्या की १ जानेवारी २०२१ ला या प्रकरणाची चौकशी सुरू झाली आणि याची माहिती देखील त्यांना पत्रकारांकडून मिळाली.

चित्रा वाघ पुढे म्हणाल्या की, ‘२०११ पासून एसीबीच्या अनेक केस पेंडिंग आहेत. या केसमध्ये देखील पैसे घेणाऱ्या मुख्य आरोपींची चौकशी सुरू आहे पण गुन्हा मात्र माझ्या नवऱ्यावर? मी न्यायालयात लढेन. फक्त चित्रा वाघचा नवरा आहे याची शिक्षा किशोर वाघ यांना दिली जात आहे’. यावेळी त्यांनी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाचा देखील पुनरुच्चार केला. याबाबत बोलताना चित्रा वाघ म्हणाल्या की, ‘मी तुम्हाला पुरून उरेल, माझ्यावर कितीही गुन्हे दाखल केलेत तरीही मी रोज बोलणार. संजय राठोड यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही.’ संजय राठोड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी चित्रा वाघ गेल्या काही दिवसांपासून करत आहेत.

किशोर वाघ हे मुंबईतील परेल याठिकाणी असणाऱ्या गांधी स्मारक रुग्णालयात वैद्यकीय अभिलेख ग्रंथपाल या पदावर कार्यरत होते. दिनांक ५ जुलै २०१६ रोजी एका प्रकरणात ४ लाख रुपयांची लाच घेताना अटक झाल्यानंतर किशोर वाघ यांना निलंबित करण्यात आले होते. या लाच प्रकरणाच्या पार्श्वभूमीवरच दिनांक १ डिसेंबर २००६ ते दिनांक ५ जुलै २०१६ या सेवा कालावधीतील किशोर वाघ यांच्या संपत्तीची ACB कडून खुली चौकशीही लावण्यात आली होती. या खुल्या चौकशीच्या अहवालानुसार प्रथमदर्शनी दोषी आढळल्यामुळे लाचलुचपत विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त नवनाथ जगताप यांच्या तक्रारीवरुन किशोर वाघ यांच्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ अन्वये १३(२) व १३(१)E या कलमांतर्गत दिनांक १२ फेब्रुवारी २०२१ रोजी मुंबई येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.