महागड्या गाड्या स्वस्तात देण्याच्या अमिषाने फसवणूक करणारी महिला अटकेत

ठाणे : पोलीसनामा ऑनलाईन – महागडी वाहने स्वस्तात देण्याच्या अमिषाने फसवणूक करणाऱ्या महिलेला ठाणे गुन्हे शाखेच्या युनीट १ च्या पथकाने अटक केली. दिप्ती रविकांत मुळीक (३४, रा. माहीम, मुंबई) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात खारेगाव येथील रहिवासी किरण शहा (४०) यांनी तक्रार दाखल केली आहे.

वाहन विक्री करणाऱ्या वेगवेगळ्या कंपन्यांशी आपली ओळख असल्याची बतावणी करून दिप्ती हिने शहा यांना स्वस्तात वाहन मिळवून देण्याचे अमिष दाखवले. ३१ लाख ५६ हजार १२६ रुपयांची नामांकित कंपनीची कार अवघ्या आठ लाख ५० हजारांमध्ये मिळवून देण्याचे सांगितले.

त्यांचा मॅनेजर चंदन यादव यांच्याकडून तिने दोन लाख ८५ हजार रुपये रक्कम कळवा येथील रूपाली कन्स्ट्रक्शनच्या कार्यालयात घेतली. ही रक्कम घेतल्यानंतर कार बुक केल्याचे सांगून तीन लाख रुपयांची बनावट पावती व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवली. मात्र, हा प्रकार खोटा असल्याचे त्यांना समजले. त्यानंतर त्यांना कारन देता  त्यांची दोन लाख ८५ हजारांची फसवणूक केली. त्यानंतर त्यांनी कळवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.