महात्मा गांधींचा भारत हवा की गोडसेचा हे जनतेनेच ठरवावे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था- काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी दिल्ली येथे बोलताना भाजपा आणि आरएसएसवर निशाणा साधला. तुम्हाला महात्मा गांधीचा भारत पाहिजे की नथुराम गोडसेंचा हे आता तुम्हीच ठरवायचे आहे, राहुल गांधी यांनी म्हटले आहे. लोकसभा निवडमुकांमध्ये जनता काँग्रेसला कौल देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

भाजपाने मागील पाच वर्षात द्वेषाचे राजकारण केले आहे. समाजात तेढ कशी निर्माण होईल, द्वेष कसा पसरेल हेच भाजपाने पाहिले आहे. आता जनतेने ठरवायचे आहे की गांधींचा भारत की नथुराम गोडसेचा भारत हवा आहे. एकीकडे द्वेष, तेढ आणि तिरस्कार आहे तर दुसरीकडे प्रेम माया आणि आपुलकी आहे. असंही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

आजच्या भाषणात राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही निशाणा केला. स्वतःला चौकीदार म्हणवणाऱ्या पंतप्रधानांना आम्ही काही प्रश्न विचारले होते. त्यावर संसदेत पंतप्रधान दीड तास बोलले मात्र राफेल करारात अनिल अंबानींचा सहभाग का? यावर मोदी काहीही बोलले नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला दिलेली सगळी आश्वासनं फोल ठरली आहे. मेक इन इंडियावरूनही त्यांनी मोदींवर निशाणा साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी मेक इन इंडियाचा नारा कायम देतात. मात्र त्यांचे शर्ट, बूट आणि फोन हे सगळं मेड इन चायना आहेत. ज्या फोनमधून पंतप्रधान सेल्फी काढतात तोही मेड इन चायना आहे असंही राहुल गांधी म्हटले आहेत.