महापौर पदासाठी उपनगरातूनही ‘इच्छुक’, पद देताना भाजप नेत्यांच्या डोक्याला ‘खुराक’ !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – महापौर पदावरून पुणे महापालिकेमध्ये चर्चेला उधाण आले आहे. यंदातरी महापौर पदी नवीन चेहऱ्याला संधी द्यावी, अशी मागणी होऊ लागल्याने महापौर पदाची निवड भाजप नेत्यांसाठी डोकेदुखी ठरणार असल्याचे बोलले जात आहे.

पुणे महापालिकेचे महापौर पद पुढील अडीच वर्ष खुल्या गटासाठी राहणार आहे. 2017 मध्ये पहिल्यांदाच पालिकेत सत्तेत आलेल्या भाजपने अनुभवी नगरसेवकांना महत्वाच्या पदांवर संधी दिली आहे. किंबहुना 3 – 4 टर्म विरोधात असताना निवडून येणाऱ्यांना संधी देणे अपेक्षितच होते. त्यानुसारच मुक्ता टिळक, श्रीनाथ भिमाले, मुरलीधर मोहोळ, सुनिल कांबळे, योगेश मुळीक या पक्षाच्या वरिष्ठ नगरसेवकांना महापौर, सभागृहनेता, स्थायी समिती अध्यक्षपदी संधी देण्यात आली आहे.

परंतु सत्तेत आलेल्या भाजपचे आकडेवारीचे गणित पाहता, प्रथमच 36 हुन थेट 99 सदस्य संख्याबळ गाठले आहे. विशेष असे की या 99 मध्ये अन्य पक्षातून आलेल्या सदस्यांची संख्याही मोठी आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्राबल्य असलेल्या उपनगरातूनही भाजपला चांगले यश मिळल्यानेच हा आकडा गाठणे शक्य झाले आहे. साहजिकच आहे, सत्तेची तीन वर्षे पूर्ण होत असताना किमान एका तरी पदावर संधी मिळावी अशी अपेक्षा या मंडळींकडून व्यक्त होऊ लागली आहे.

यासाठी बारामती मतदारसंघाचा भाग असलेल्या आणि लोकसभा, विधानसभा निवडणुकीत पक्षाला चांगले मताधिक्य मिळवून देणाऱ्या खडकवासला मतदार संघ, शिरूर मतदार संघाचा भाग असलेल्या खडकवासला संघामध्ये मात्र यापैकी एकही पद अद्याप देण्यात आलेले नाही. सर्व मोठी पदे कसबा, कोथरूड, शिवाजीनगर आणि पर्वती मतदार संघातच देण्यात येत असल्याबाबत नगरसेवकामध्ये खळखळ सुरू झाली आहे.

नुकतेच झालेल्या विधानसभा निवडणुकीत हडपसर, वडगावशेरी मतदार संघात भाजप उमेदवारांचा पराभव झाला आहे. खडकवासला, शिवाजीनगर आणि कॅन्टोन्मेंट मतदार संघात पक्षाच्या उमेदवारांना विजयासाठी झगडावे लागले आहे. विशेष असे की वडगाव शेरी आणि खडकवासला मतदार संघामध्ये तर अन्य पक्षातून आलेले आणि भाजपकडून नगरसेवक झालेल्यांची संख्या फार मोठी आहे. परंतु भाजपने त्यांना सत्तेत वाटा देताना हातचा राखल्याची भावना या मंडळींमध्ये निर्माण होऊ लागली आहे. पक्षाचे डॅमेज कंट्रोल रोखण्यासाठी या भागात महत्वाचे पद द्यावे अशी मागणी होऊ लागल्याने भाजप नेत्यांसाठी डोकेदुखी वाढू लागली आहे.

उपनागरातून दिलीप वेडे पाटील, वर्षा तापकीर, प्रसन्न जगताप, हरिदास चरवड, राजाभाऊ लायगुडे, बॉबी टिंगरे, बापूसाहेब कर्णे गुरुजी, किरण दगडे पाटील, संजय घुले, मारुती आबा तुपे, उमेश गायकवाड अशी काही नावे महापौर पदासाठी चर्चिली जाऊ लागली आहेत.

Visit : Policenama.com