जेव्हा युतीच्या प्रचारात दिल्या जातात ‘चौकीदार चोर है’च्या घोषणा..

यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाइन – भाजप आणि शिवसेना यांच्यात युती झाली आहे. पण अजूनही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना ती पचनी पडलेली दिसत नाही. त्यामुळे त्यांच्याच उमेदवाराच्या प्रचार फेरीत भाजप पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शिवसैनिकांनी ‘चौकीदार चोर है’ च्या घोषणा दिल्या. त्यामुळे प्रचार फेरी ऐवजी तेथे नागरिकांना हाणामारी पाहण्याची वेळ आली. बंदोबस्त असल्याने पोलिसांनी हा प्रकार तातडीने थांबविल्याचे एकमेकांची डोकी फुटण्याचा प्रसंग टळला.

शिवसेनेच्या उमेदवार भावना गवळी यांच्या प्रचारासाठी फेरीचे आयोजन करण्यात आले होते. त्याला भाजप पदाधिकारीही उपस्थित होते. शिवाजी चौकात गवळी आल्यानंतर त्यांनी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन केले, त्यानंतर रॅलीला सुरुवात होणार होती. मात्र, गवळी या शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला हार घालत असताना शिवसैनिकांनी घोषणा देण्यास सुरुवात केली. त्यावेळी शिवसेनेच्या पदाधिकऱ्यांनी ‘चौकीदार चोर है’ च्या घोषणा दिल्या. या घोषणांमुळे रॅलीला उपस्थित राहिलेल्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा राग अनावर झाला. त्यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना चोप देण्यास सुरुवत केली. त्यामुळे शिवाजी चौकात एकच गोंधळ उडाला.

भावना गवळी यांनी मध्यस्थी केल्यानंतर हा वाद शमला. मात्र, त्यानंतर रॅलीमध्ये सहभागी न होता भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते निघून गेले. त्यामुळे शिवसेनेच्या मोजक्या कार्यकत्यांच्या साथीने गवळी यांनी रॅली कशीबशी उरकली.